शिवसेना हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी केली. मुंबई मध्ये मराठी माणसांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली होती.
१७ फेब्रुवारी २०२३ च्या निवडणूक आयोगाच्या निकालानुसार, या पक्षाचे अध्यक्षपद(मुख्य नेता) एकनाथ शिंदे यांच्याकडे असले तरी, ह्या निर्णयाविरोधातील अपील प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
शिवसेनेने १९८९ साली बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षबरोबर युती केली व १९९५ साली महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचे सरकार अस्तित्वात आले व शिवसेनेचे मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले होते.
केंद्रात १९९९ साली अस्तित्वात आलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सेनेचे मनोहर जोशी हे लोकसभा अध्यक्ष होते.
२०१४ साली शिवसेना व भाजप यांची युती तुटली, दोन्ही पक्ष वेगळे लढले व पुन्हा एकदा एकत्र येत सरकार स्थापन केले.
२०१९ साली शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले तथापि विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली, पण मुख्यमंत्रीपदावरून दोघांमध्ये वाद झाला व शिवसेनेने युती तोडली.
शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्या बरोबर महाविकास आघाडी स्थापन केली व उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे १९वे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेसकडे विधानसभाध्यक्षपद, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्री पद होतं.
मात्र, २१ जून २०२२ रोजी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसोबत बंड केल्याने २९ जून रोजी उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेच्या दृष्टीने राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले.
त्यानंतर राज्यात शिंदे हे भाजपच्या समर्थनाने मुख्यमंत्री झाले.
मुख्यमंत्रीपद शिंदे गटाकडे, तर उपमुख्यमंत्री आणि विधानसभाध्यक्ष ही दोन्ही पदे भाजपच्या वाट्याला गेली, तथापि २०२३ मध्ये याला महायुतीचे स्वरूप प्राप्त होवून २रे उपमुख्यमंत्री अजित पवार झाले.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे पदावनत होवून उपमुख्यमंत्री पदावर समाधानी राहिले.
शिवसेना
यामागील विज्ञान आणि इतिहास.