शब्बीर अन्सारी (मृत्यू २२ मार्च २०२६) महाराष्ट्रातील मुस्लिम ओबीसी चळवळीचे एक प्रमुख संघटक होते. त्यांचा जन्म जालना येथे झाला. जुलाहा म्हणजे विणकरी त्यांच्या कुटुंबीयांचा पिढीजात व्यवसाय होता. जालना शहरात नावाजलेले शिंपी म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. होजिअरी उद्योग करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. व्यावसायिक यश मिळवण्यासाठी मुंबई गाठली. याच काळात ते सामाजिक कार्याशी जोडले गेले.मग १९८१ साली त्यांनी ‘महाराष्ट्र राज्य ओबीसी संघटना’ स्थापन केली.
विणकाम करत दारिद्र्याशी दोन हात करताना शब्बीर अन्सारी यांनी सामाजिक कार्याचे भान जोपासले. आपणही ओबीसी आहोत ही जाणीव त्यांच्यामध्ये वाढत गेली. मुस्लिमांमध्ये मागासपणाची एक जात असते हेच समजत नव्हते. तो समज वाढविण्यासाठी शब्बीर अन्सारी यांनी पुढाकार घेतला.
मंडल आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणीची व्हावी म्हणून त्यांनी देशभर दोरे केले. उत्तर भारतात सुरू झालेल्या मंडल चळवळीचे ते एक संघटक होते. कर्पुरी ठाकूर, रामविलास पासवान, शरद यादव, कांशीराम, मुलायमसिंग यादव इत्यादी नेत्यांसोबत ते जोडले गेले.
मंडल आंदोलनानंतर महाराष्ट्रात ॲड. जनार्दन पाटील व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी ओबीसी चळवळ सुरू केली होती. त्यात शब्बीर अन्सारी यांना मुस्लिमांची मोटबांधणीसाठी पाटील यांनी सामावून घेतले होते. जनार्दन पाटील यांच्या ओबीसी संघटनेत शब्बीर अन्सारी मुस्लिम ओबीसी विभागाचे प्रमुख होते. या चळवळीत कॉम्रेड विलास सोनवणे देखील होते.
१९८९ साली काळात महाराष्ट्रात मुस्लिम मराठी साहित्य चळवळ सुरू झाली. त्याचे प्रमुख संघटक प्रा. फकरुद्दीन बेन्नूर, विलास सोनवणे, अजीज नदाफ इत्यादी मंडळी होती. या चळवळीतूनच महाराष्ट्रातील मुस्लिम ओबीसींची स्वतंत्र संघटना बांधावी ही कल्पना पुढे आली. त्याप्रमाणे १९९४ साली मुस्लिम ओबीसी संघटना अस्तित्वात आली. प्रा. फकरुद्दीन बेन्नूर, विलास सोनवणे, अजीज नदाफ, बशारत अहमद, जावेद पाशा कुरैशी यांचे प्रयत्न होते. शब्बीर अन्सारीदेखील या चळवळीत जोडून घेण्यात आले. पुढे त्यात असगर अली इंजिनियर सारखे इस्लामिक विद्वान व इतर अनेक मोठे नेते सहभागी झाले.
कालांतराने ही संघटना 'ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन' या नावाने देशभर विस्तारली. त्यात प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार व जॉनी वॉकर यांनाही मागास मुस्लिम (पसमांदा) चळवळीशी जोडून घेण्यात आले. हळूहळू त्यात कपिल पाटील, हसन कमाल, अंजुमन-ए-इस्लामचे डॉ. जहीर काझी आणि पुण्यातील आजम कॅम्पसचे प्रमुख पी.ए. इनामदार यांच्या सहकार्याने ही चळवळ महाराष्ट्रभर विस्तारली.
प्रा. फकरुद्दीन बेन्नूर व विलास सोनवणे या चळवळीचे वैचारिक मार्गदर्शक होते. त्यांनी चळवळीसाठी साहित्य निर्मिती केली. प्रा. बेन्नूर यांचे बहुचर्चित 'भारतीय मुसलमानांची समाज रचना आणि मानसिकता' हे पुस्तक या चळवळीची निर्मिती आहे. या चळवळी विषयी प्रा. बेन्नूर यांनी विपुल प्रमाणात लेखन केलेले आहे.. परंतु एका सूत्रात नाही. पण त्यांचे आत्मकथन 'कुदरत'मध्ये चळवळीविषयी विस्ताराने कथन केलेले आहे. पुढे या चळवळीने महाराष्ट्रातील मुस्लिम समाजातील ६०-७० मागास जाती शोधून काढल्या आणि मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार त्यांना ओबीसी आरक्षणाच्या कक्षेत समाविष्ट करून घेण्याची शिफारस सरकारकडे केली. त्याप्रमाणे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मागास मुस्लिम जातीची नव्याने नोंद करून त्यांना आरक्षणाच्या सकारात्मक प्रक्रियेत आणले.
या प्रक्रियेनंतर महाराष्ट्रातील जुलाहा, बुनकर, कासार, मोमीन, अत्तार, मेहतर, बकर कसाब, कुरेशी, मुलाणी, अस्वलवाले, माकडवाले, छप्परबंद डफलीवाले, रंगरेज, रंगारी, गुजर, मुजावर, मदारी, पिंजारी, नदाफ, पाथरवट, तांबोली, फकीर, अन्सारी अशा वंचित समाजातील मुले आता शिकू लागली. पुढे त्यातील अनेकजण मुस्लिम ओबीसी चळवळीशी जोडले गेले. याच संघटनेच्या प्रेरणेने उत्तर भारतात अली अनवर अन्सारी यांनी पसमांदा चळवळ सुरू केली. या संदर्भात त्यांनी आपल्या 'मसावात की जंग' पुस्तकात लिहिले आहे. पुढे अली अनवर यांनी पसमांदा चळवळीसाठी मोठ्या प्रमाणात संशोधन साहित्य तयार केले. त्यांच्या 'ऑल इंडिया पसमांदा मुस्लिम महाज संघटने'ला राज्यसभेत उमेदवारी दिली गेली. संघटनेचे दोन सदस्य राज्यसभेत होते. त्यात अली अनवर यांचाही सहभाग होता. अली अनवर यांच्यापूर्वी उत्तर भारतात अब्दुल कय्युम अन्सारी यांनी मागास मुस्लिमांचा विषय लावून धरला होता.
१९९९ च्या विधानसभा निवडणुकीच्या आसपास महाराष्ट्रातील मुस्लिम ओबीसी संघटनेत फूट पडली. किरकोळ वादानंतर शब्बीर अन्सारी, विलास सोनवणे, जावेद पाशा कुरैशी वेगळे झाले.. बेन्नूर हेदेखील चळवळीतून बाहेर पडले. या संदर्भात प्रा जावेद पाशा कुरेशी यांनी प्रा. फकरुद्दीन बेन्नूर स्मृति ग्रंथात लिहिलेला लेख उद्बोधक आहे. संघटनेत फूट पडल्यानंतर अनेक नेते बाजूला झाले. परंतु शब्बीर अन्सारी व त्यांचे इतर सहकाऱ्यांनी मागास मुसलमानांच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक विकासाचा विषय शेवटपर्यंत लावून धरला.
चळवळीतील अंतर्गत राजकारण व फुटीवर डॉ. बशारत अहमद यांनी मुक्त शब्द, ईदोत्सव, २०२४ मध्ये एक लिंक लिहिलेला आहे. त्यातून चळवळ संपुष्टात आणण्यासाठी ठरलेल्या कारक घटकावर विस्ताराने प्रकाश टाकलेला आहे..
शब्बीर अन्सारी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?