फकरुद्दीन बेन्नूर (२५ नोव्हेंबर इ.स. १९३८ - १७ ऑगस्ट इ.स. २०१८) हे एक महाराष्ट्रातील मुस्लिम विद्वान व बुद्धिजीवी होते. वाढती कर्मठता, वाईट रूढी-परंपरा आणि हिंदुत्ववाद इत्य़ादी विषयांवर ते सन १९६८ पासून सातत्याने लिखाण करत होते. १९३८ साली सातारा जिल्ह्यात जन्मलेल्या फकरुद्दीन बेन्नूर यांनी राज्यशास्त्रात एम.ए. केल्यानंतर संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर येथे १९६६ सालापासून अध्यापन सुरू केले. इतिहास, साम्राज्यवाद, जागतिकीकरण, इतिहासशास्त्र, भांडवलशाही, गांधीवाद, साम्राज्य़वाद, साम्यवाद, हिंदुत्व, इस्लाम आणि अरब देश हे त्याच्या अभ्यासाचे विषय होते. त्यांनी सोलापूरमधील कामगार चळवळ तसेच डाव्या चळवळीतही दीर्घ काळ काम केले आहे.
सन १९८९मध्ये फकरुद्दीन बेन्नूर यांनी 'मुस्लिम मराठी साहित्य परिषदे'ची स्थापना करून मराठी साहित्य चळवळीत मुसलमानांचा सहभाग नोंदवला. १९९२ साली त्यांनी महाराष्ट्र पातळीवर 'मुस्लिम ओबीसी संघटना' स्थापन करून मागास मुस्लिमांचे प्रश्न अधोरेखित केले. १९७०पासून त्यांनी सुधारणावादी चळवळीसाठी कामाला सुरुवात केली. त्याच काळापासून त्यांनी लेखन सुरू केले. सुरुवातीला त्यांनी 'दैनिक संचार' व 'सोलापूर समाचार' मधून लिखाण केले. समाज प्रबोधन पत्रिका, अक्षरगाथा, परिवर्तनाचा वाटसरू, सत्याग्रही विचारधारा इत्यादी नियतकालिकांत त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांचे एक हजारपेक्षा जास्त लेख प्रकाशित झाले आहेत. भारतीय मुसलमान, इस्लाम व भारतातील धार्मिक हिंसाचार या विषयांवर त्यांनी पुस्तके लिहिली. त्यांची मराठी, हिंदी आणि उर्दूतून अशी एकूण १३हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यांतील बहुतांश पुस्तके ही मुस्लिम समाजाचे अंतरंग दर्शविणारी आहेत. दीडशेहून अधिक शोधनिबंधांचे त्यांनी वाचन केले आहे. याशिवाय देशभरात विविध चर्चासत्रे, परिसंवादांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. मुस्लिम विचारवंत व राजकीय विश्लेषक म्हणून ते ओळखले जातात.
फकरुद्दीन बेन्नूर हे महाराष्ट्रातील सुधारणावादी चळवळीत काम करणारे सक्रिय कार्यकर्ते होते. बेन्नूर यांनी देशात व महाराष्ट्रात विविध विषयांवर व्याख्याने दिली आहेत. त्यांचे आत्मचरित्रही प्रकाशित होणार आहे. बेन्नूर यांनी असगरअली इंजिनियर आणि डॉ. मोईन शाकीर यांच्यासोबत काम केले आहे. प्रा. बेन्नूर हे अविवाहित होते
फक्रुद्दीन बेन्नूर
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!