विल्यम टेकुम्सेह शेरमन (८ फेब्रुवारी, १८२०:लँकेस्टर, ओहायो, अमेरिका - १४ फेब्रुवारी, १८९१:न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, अमेरिका) हा अमेरिकेचा सेनापती, उद्योजक आणि लेखक होता. अमेरिकन यादवी युद्धादरम्यान हा उत्तरेच्या सेनेतील एक सेनापती होता. ब्रिटिश युद्धाभ्यासक बी.एच. लिडेल हार्टच्या मते हा पहिला आधुनिक सेनापती होता.
यादवी युद्धादरम्यान शेरमनने कठीण युद्ध (हार्ड वॉर) ही रणनीती अवलंबिली होती. त्याच्या मते दक्षिणेचा पूर्णपणे पराभव करण्यासाठी त्यांच्या सैन्याचाच नाश नव्हे तर आर्थिक, मानसिक आणि व्यूहात्मक शक्तीचा नाश करणे आवश्यक होते, ज्याकरणे पुन्हा ते डोके वर काढू शकणार नाहीत. त्याने १५ नोव्हेंबर, १८६४ ते २१ डिसेंबर, १८६४ दरम्यान जॉर्जियाची राजधानी अटलांटा पासून अटलांटिक समुद्रावरील सव्हाना शहरापर्यंतचा मुलुख जिंकून घेतला. शत्रूच्या प्रदेशात खोलवर घातलेल्या या धाडी दरम्यान त्याला उत्तरेची कुमक मिळणे शक्य नव्हते. पाठलाग करणाऱ्या दक्षिणेच्या सैन्यालाही स्थानिक मदत मिळू नये व त्यांची युद्धशक्ती कमकुवत व्हावी यासाठी त्याने अटलांटा ते सव्हाना मार्गातील प्रदेशाची त्याने राखरांगोळी केली. या मोहीमेला शेरमनची समुद्रापर्यंतची कूच असे नाव देण्यात आले. युद्धशास्त्रातील सर्वभक्षी लढाई (टोटल वॉर) या व्यूहाचे हे सुरुवातीचे उदाहरण समजले जाते. शेरमनच्या व्यूहरचनेचा प्रभाव नाझी जर्मनीचे सेनापती हाइन्झ गुडेरियानच्या ब्लिट्झक्रीग आणि अर्विन रोमेलच्या रणगाडा युद्धनीतीवर दिसून येतो.
विल्यम टेकुम्सेह शेरमन
या विषयातील रहस्ये उलगडा.