लिअँडर एड्रीयन पेस ( जून १७, १९७३) एक भारतीय व्यावसायिक टेनिसपटू आहे. लिअँडर सध्या ए.टी.पी. टूरमधील दुहेरी तसेच डेव्हिस करंडक स्पर्धांमध्ये टेनिस खेळतो. आजवर पुरुष दुहेरीमध्ये ८ तर मिश्र दुहेरीमध्ये १० ग्रँड स्लॅम स्पर्धांची अजिंक्यपदे मिळवणारा पेस हा जगातील सर्वोत्तम दुहेरी टेनिस खेळाडूंपैकी एक मानला जातो. सर्वाधिक वयामध्ये ग्रँड स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याचा मान त्याच्याकडेच जातो. भारतामधील आजतागायतचा सर्वात यशस्वी टेनिस खेळाडू असलेल्या पेसला १९९६-९७ मध्ये राजीव गांधी खेल रत्न, १९९० मध्ये अर्जुन पुरस्कार तर २००१ साली पद्मश्री हे भारतामधील अनेक उच्च पुरस्कार मिळाले आहेत.
१५ ग्रँड स्लॅम विजेतेपदे मिळवण्यासोबतच पेस त्याच्या १९९६ अटलांटा ऑलिंपिक स्पर्धेमधील पुरुष एकेरीमध्ये कांस्यपदक मिळवण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. १९९२ ते २०१२ दरम्यान सलग सहा ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला पेस हा एकमेव भारतीय खेळाडू तर जगातील एकमेव टेनिस खेळाडू आहे. इतर स्पर्धांमध्ये त्याने भारतासाठी अनेक पदके जिंकली आहेत. डेव्हिस करंडकासाठीच्या भारतीय संघाचा तो अनेक वर्षे कर्णधार होता. २०१० सालच्या विंबल्डन स्पर्धेमध्ये विजय मिळवून पेस रॉड लेव्हरखालोखाल तीन वेगवेगळ्या दशकांमध्ये विंबल्डन विजेतेपदे मिळवणारा दुसराच टेनिस खेळाडू ठरला. २०१० साली पेसने ऑलिंपिक गोल्ड क्वेस्ट ह्या गीत सेठी व प्रकाश पडुकोण ह्यांनी स्थापन केलेल्या संस्थेमध्ये प्रवेश केला. भारतीय खेळाडूंना ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पदके मिळवण्यासाठी प्रोत्साहन व प्रशिक्षण देणे व अधिकाधिक जागतिक दर्जाचे खेळाडू घडवणे हे ह्या संस्थेचे ध्येय आहे.
लिअँडर पेस
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?