रॉजर फेडरर (जर्मन: Roger Federer) हा स्वित्झर्लंड देशाचा एक टेनिसपटू आहे. याला ग्रिन कोर्टचा बादशहा या नावाने सुद्धा संबोधले जाते. अनेक टेनिस तज्ज्ञांच्या व क्रीडा समिक्षकांच्या मते फेडरर टेनिसच्या इतिहासातील आजतगायतचा सर्वोत्तम खेळाडू मानला जातो. त्याच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. फेडररने आजवर सर्वाधिक (१८) एकेरी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. चारही ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या केवळ ७ पुरुष टेनिस खेळाडूंमध्ये फेडररचा समावेश होतो. २००४ ते २००८ दरम्यान फेडरर सलग २३७ आठवडे एटीपीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर होता (एकूण २८५ आठवडे). २०१२ सालची विंबल्डन स्पर्धा जिंकून त्याने जागतिक क्रमवारीत पुन्हा पहिले स्थान मिळवले. आजवर २८ ग्रँड स्लॅम अंतिम फेऱ्यांचे सामने खेळलेला फेडरर सर्व ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेऱ्या किमान ५ वेळा गाठणारा टेनिस इतिहासातील एकमेव पुरुष खेळाडू आहे.
फेडररने आजवर १७ मास्टर्स टेनिस स्पर्धा (दुसऱ्या क्रमांकावर) जिंकल्या असून एटीपी वर्ल्ड टूर फायनल्सचे सहा वेळा विजेतेपद पटकावले आहे. २००८ बीजिंग ऑलिंपिकमध्ये त्याने स्टॅनिस्लास वावरिंकासोबत स्वित्झर्ल्डंसाठी पुरुष दुहेरी टेनिसमध्ये सुवर्णपदक तर २०१२ लंडन ऑलिंपिकमध्ये एकेरी स्पर्धेत रौप्यपदक मिळवले.
फेडररला आजवर सर्वाधिक वेळा (सलग ४ वेळा) लॉरियस वार्षिक क्रीडापटूचा खिताब मिळाला आहे. २०१२ साली आजवरचे जगातील सर्वोत्तम १०० टेनिस खेळाडू ह्या टेनिस वाहिनीने काढलेल्या यादीत फेडरर सर्वोच्च स्थानावर आहे. तसेच २०११ साली नेल्सन मंडेला ह्यांच्याखालोखाल जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात विश्वासू व सन्माननीय व्यक्ती असा कौल फेडररला चाहत्यांनी दिला. रफायेल नदाल व नोव्हाक जोकोविच सोबत फेडररची प्रतिस्पर्धा जगातील सर्वोत्कृष्ट क्रीडा प्रतिस्पर्धांपैकी एक मानली जाते. रॉजर फेडरर एक ग्रेट टेनिस प्लेयर आहे.
रॉजर फेडरर
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.