लक्ष्मीविलास पॅलेस

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

लक्ष्मीविलास पॅलेस

लक्ष्मीविलास पॅलेस हा गुजरातच्या वडोदरा शहरातील एक आलिशान राजवाडा आहे. हा राजवाडा बडोद्याचे महाराज तिसरे सयाजीराव ह्यांनी १८९० साली १.८ लाख पाउंड इतक्या खर्चामध्ये बांधला. तिसरे सयाजीराव यांनी आपल्या कारकिर्दीत बडोद्याचे संस्थान वैभवसंपन्न केले. त्यांनी आकर्षक भव्य इमारती, उद्याने, हिरवळीची मैदाने, कारंजी, रुंद रस्ते तयार करून बडोदा शहर सुशोभित केले. त्यांनी बांधलेल्या इमारतींमध्ये 'लक्ष्मीविलास पॅलेस' या राजवाड्याच्या वास्तूचा सर्वात वरचा क्रमांक लागतो.

७०० एकर परिसरात मध्यभागी बांधलेला या राजवाड्यात बडोद्याच्या महाराजांचे निवासस्थान आणि राजदरबाराचा दिवाणखाना होता. सयाजीरावांनी मेजर माँट या ब्रिटिश इंजिनीअरकडून या वास्तूचा आराखडा तयार करून घेतला. इ.स. १८९० साली बांधून पूर्ण झालेल्या लक्ष्मीविलास पॅलेससाठी नवसारीजवळच्या सोनगडच्या खाणीतून तांबूस रंगाचा दगड आणला होता. ५०० फूट लांब आणि २०० फूट रुंद बांधकाम असलेल्या या राजवाड्याच्या मनोऱ्याची उंची आहे २०४ फूट. राजदरबाराच्या मुख्य दिवाणखान्याचे आकारमान ९४ फूट लांब, ५४ फूट रुंद व २२ फूट उंच इतके आहे. खास व्हेनिसहून आणलेल्या फरशा दरबार हॉलमध्ये बसविण्यासाठी व्हेनिसचेच बारा कारागीर अठरा महिने काम करीत होते. या दरबार हॉलच्या प्रत्येक कोपऱ्यात इटालियन शिल्पकार फेलीची याने बनविलेले संगमरवरी पुतळे असून राजघराण्यातील स्त्रियांना बसण्यासाठी हॉलच्या पहिल्या मजल्यावर गॅलऱ्या आहेत.

राजवाड्यातील संपूर्ण फर्निचर फ्रान्समध्ये तयार केलेले असून लक्ष्मीविलास पॅलेसच्या दक्षिणेकडील भागात महाराजांचे निवासस्थान आहे.

'लक्ष्मीविलास'च्या परिसरात असलेल्या मोतीबाग पॅलेस आणि फतेहसिंग म्युझियम या भव्य इमारतींमध्ये शस्त्रागार आणि महान चित्रकार राजा रविवर्मा यांनी चितारलेली तैलचित्रे आहेत. राजवाड्याभोवतीच्या परिसरात असलेली उद्याने, हिरवळीची कुरणे आणि कारंजी ही विल्यम गोल्डिरग या ब्रिटिश उद्यानतज्ज्ञाने तयार केली आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →