लंडनचे धुकेसंकट किंवा द ग्रेट स्मॉग ऑफ लंडन ही डिसेंबर १९५२ मध्ये इंग्लंडची राजधानी लंडनमधील वायू प्रदूषण घटना होती. १९५२. असामान्य थंड हवामानाचा काळ, त्यावेळी आलेले अँटीसायक्लोन आणि थंडावलेल्या वाऱ्यामुळे शहरावर दाट धूर आणि धुके पसरले. हे धुके आणि धूर शुक्रवार, ५ डिसेंबर ते मंगळवार, ९ डिसेंबर पर्यंत शहरावर दाटून राहिले व शेवटी वारे सुटल्यानंतर पांगले.
लंडनमध्ये किमान १३ व्या शतकापासून प्रदूषण मोठी समस्या आहे. १६६१पासून या बद्दलच्या नोंदी आहेत. त्यातही हे संकट तोपर्यंतच्या कोणत्याही प्रदूषणापेक्षा अनेक पटीने वाईट होते. फक्त लंडन नव्हे तर युनायटेड किंग्डमच्या इतिहासातील ही सर्वात वाईट वायू प्रदूषण घटना मानली जाते. यानंतर पर्यावरणीय संशोधन, सरकारी नियमन आणि हवेची गुणवत्ता आणि आरोग्य यांच्यातील संबंधांबद्दल जनजागृती होउन यामुळे युनायटेड किंग्डममधील नियम आणि कायद्यांबध्ये अनेक बदल झाले, ज्यात स्वच्छ हवा कायदा १९५६ समाविष्ट आहे.
५ तारखेला धुके पसरण्यास सुरुवात झाली तेव्हा जनतेने किंवा सरकारने कोणतीही पावले उचलली नाहीत लंडन अशा धुक्यासाठी कुप्रसिद्ध आहे. या वेळेसचे धुके मात्र "मटार-सूपर" पेक्षा जास्त दाट होते आणि पटकन विरत नव्हते. शहरात काही मीटर पलीकडे दिसणे अशक्य झाले होते आणि त्यामुळे गाडी चालवणे कठीण/अशक्य झाले.
जसजसे हे धुके पसरु लागले तसे लंडन अंडरग्राउंड व्यतिरिक्त शहरातील सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आल्या. वाहन अपघातांच्या संख्येमुळे रुग्णवाहिका सेवांवर मोठा ताण आला होता. धुके इतके दाट होते की ते इमारतींच्या आतही शिरले, परिणामी संगीत कार्यक्रम आणि चित्रपटांचे प्रदर्शन रद्द करण्यात आले. चित्रपटगृह आणि नाट्यगृहांतील मंच आणि पडदेसुद्धा दिसणे कठीण झाले. मैदानी क्रीडा स्पर्धा देखील रद्द करण्यात आल्या.
धुके विरल्यानंतरच्या आठवड्यात वैद्यकीय सेवांनी संकलित केलेल्या आकडेवारीत असे आढळून आले की धुक्यामुळे ४,००० लोकांचा मृत्यू झाला. बळी पडलेल्यांपैकी बरेच जण अगदी लहान किंवा वृद्ध होते, किंवा त्यांना आधीच श्वसन किंवा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या समस्या आणि रोग होते. फेब्रुवारी १९५३ मध्ये, कामगार पक्षाचे खासदार मार्कस लिप्टन यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये असे सुचवले की धुक्यामुळे ६,००० लोकांचा मृत्यू झाला आहे आणि त्या काळात लंडनमध्ये २५,००० पेक्षा जास्त लोकांना इलाजाची गरज पडली.
धुक्यानंतरही अनेक महिने लंडनमधील मृत्युदर नेहमीपेक्षा अधिक होता. एका प्राथमिक अहवालात (जो कधीही अंतिम झाला नाही) त्या मृत्यूंना इन्फ्लूएंझा साथीमुळे झाल्याचे ठरविण्यात आले. यात अगदी थोडे तथ्य होते. सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागातील वातावरणीय प्रदूषणाचे प्रभारी अधिकारी म्हणून त्या वेळी यूकेचे सर्वोच्च प्रदूषण तज्ञ असलेले ईटी विल्किन्स यांनी डिसेंबर १९५२ ते मार्च १९५३ या कालावधीसाठी वाढीव मृत्युदरांचा आराखडा तयार केला असता असे आढळून आले की सुरुवातीला मोजलेल्या मृत्यूंपेक्षा जास्त ८,००० मृत्यू झाले आहेत. त्याजोगे एकूण १२,००० मृत्यू झाले असल्याचे लक्षात आले. बहुतेक मृत्यू श्वसनमार्गाच्या संसर्गामुळे, हायपोक्सियामुळे आणि धुक्यामुळे झालेल्या फुफ्फुसांच्या संसर्गामुळे उद्भवणाऱ्या सर्दी, यांकारणे झालेल्या हवेच्या मार्गांमधील अडथळ्यांनी झाले. फुफ्फुसांचे संक्रमण प्रामुख्याने ब्रोन्कोन्यूमोनिया किंवा तीव्र ब्राँकायटिस होते.
ही १२,००० मृत्यूंची संख्या त्यावेळच्या सरकारी एकूण संख्येपेक्षा तीन ते चार पट जास्त होती परंतु विल्किन्सच्या मूळ अंदाजाच्या अगदी जवळ होती. या धुक्यामुळे गर्भातील किंवा अर्भक असलेल्या व्यक्तींची बुद्धिमत्ता कमी होण्याची आणि त्यांच्या समवयस्कांपेक्षा श्वसनआरोग्य खराब होण्याचीही भीती होती.
या संकटानंतर १९५२ पासून युनायटेड किंग्डममध्ये अनेक पर्यावरणीय कायदे लागू केले गेले. यांत लंडन शहर (विविध अधिकार) कायदा १९५४ तसेच १९५६ आणि १९६८ चे स्वच्छ हवा कायदे होते. यांमुळे लंडनमधील वायू प्रदूषणात घट होण्यास मदत झाली. लंडनमधील रहिवाशांना कोळशाच्या उघड्या शेकोट्यांऐवजी पर्यायी (जसे की गॅस शेकोटी) शेकोट्या वापरण्यासाठी किंवा कमीत कमी धूर निर्माण करणाऱ्या शेकोट्या विकत घेण्यासाठी आर्थिक मदत देण्यात आली. त्यावेळी बहुतेक घरांमध्ये मध्यवर्ती उष्मा असणे (गॅस, वीज, तेल किंवा परवानगी असलेल्या घन इंधनाचा वापर) दुर्मिळ होते, १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धा नंतर हे प्रचलित झाले. या सुधारणा असतानाही दहा वर्षांनंतर, डिसेंबर १९६२ च्या सुरुवातीला आणखी एक धुक्याचे संकट लंडनवर आलेच होते.
लंडनचे धुकेसंकट
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.