राहुल द्रविड

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

राहुल द्रविड

राहुल द्रविड ( उच्चार ; जन्म ११ जानेवारी १९७३) हा माजी भारतीय खेळाडू आणि कर्णधार आहे. त्याला क्रिकेटच्या इतिहासातील एक महान फलंदाज म्हणून ओळखले जाते. मराठी कुटूंबात जन्म झालेल्या राहुलने, वयाच्या १२ व्या वर्षापासून क्रिकेट खेळावयास सुरुवात केली. त्यानंतर त्याने १५-वर्षांखालील, १७-वर्षांखालील आणि १९-वर्षांखालील राज्यस्तरीय संघांचे प्रतिनिधित्व केले. द वॉल, म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्रविडचा २००० साली विस्डेन क्रिकेट खेळाडू्स अल्मनाकने सर्वोत्कृष्ट पाच फलंदाजांमध्ये उल्लेख केला होता. २००४ मध्ये सुरू झालेल्या पहिल्याच आयसीसी पुरस्कार समारोहात, दरवर्षी दिला जाणारा सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि सर्वोत्कृष्ट कसोटी खेळाडूचा पुरस्कार मिळाला. डिसेंबर २०११ मध्ये, कॅनबेरा येथे ब्रॅडमन ओरेशन देणारा तो पहिला बिगर ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू होता.

एप्रिल २०१६ पर्यंत राहुल द्रविड हा कसोटी क्रिकेटमधील सचिन तेंडूलकर, रिकी पॉंटिंग आणि जॅक कॅलिसनंतर चवथा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. तसेच कसोटी आणि एकदिवसीय ह्या दोन्ही प्रकारांत प्रत्येकी १०००० धावा करणारा सचिन तेंडूलकर नंतर तो भारताचा केवळ दुसरा क्रिकेट खेळाडू आहे. २००४ मध्ये, चट्टग्राम येथे बांगलादेशविरुद्ध शतक केल्यानंतर, सर्वच्या सर्व दहा कसोटी खेळणाऱ्या देशांत शतके करणारा, तो जगातील पहिला आणि एकमेव फलंदाज झाला. एप्रिल २०१६ पर्यंत, यष्टीरक्षकाव्यतिरीक्त, कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात जास्त झेल घेण्याचा विक्रम राहुल द्रविडच्या नावावर आहे. त्याने एकूण १६४ सामन्यांत २१० झेल घेतले आहेत.

ऑगस्ट २०११ मध्ये, इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी अचानक निवड झाल्यानंतर, त्याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मधून निवृत्ती जाहीर केली आणि मार्च २०१२ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय आणि प्रथम वर्गीय क्रिकेट मधूनही निवृत्ती जाहीर केली. २०१२ इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याने राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले होते.

सिडनी येथे १ नोव्हेंबर २०१२ रोजी झालेल्या सातव्या वार्षिक ब्रॅडमॅन पुरस्कार सोहळ्यात राहुल द्रविडचा, ग्लेन मॅकग्रासोबत सन्मान करण्यात आला होता. भारत सरकारद्वारा दिल्या जाणाऱ्या पद्मश्री आणि पद्म भूषण ह्या अनुक्रमे चवथ्या आणि तिसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने द्रविडला सन्मानित करण्यात आले आहे.

२०१४ मध्ये, राहुल द्रविड बंगळूर स्थित गोस्पोर्टस् फाऊंडेशमध्ये सल्लागार मंडळाचा सभासद म्हणून सामील झाला. गोस्पोर्टस् फाऊंडेशनच्या सहकार्याने राहुल द्रविड ॲथलीट मार्गदर्शक कार्यक्रमाअंतर्गत तो भविष्यातील ऑलिंपिक आणि पॅरालिंपीक खेळाडूंना मार्गदर्शन करीत आहे. भारताचा बॅडमिंटन खेळाडू प्रणॉय कुमार, पॅरा-जलतरणपटू शरथ गायकवाड आणि तरुण गोल्फपटू चिक्करंगप्पा एस. हे तो मार्गदर्शन करीत असलेल्या सुरुवातीच्या गटातील खेळाडू आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →