रासलीला नृत्य हे उत्तर भारतातील अनेक प्रांतांमध्ये प्रचलित असलेला, संगीत-नृत्यप्रधान लोकनाट्यप्रकार आहे. नाट्यशास्त्रामध्ये रास किंवा रासक व हल्लीसक यांचा ‘उपरूपक’−म्हणजेच नृत्यप्राधान्य असलेला नाटकाचा दुय्यम रचनाप्रकार−असा उल्लेख सापडतो. रूढार्थाने कृष्णाने वृंदावनात गोपींबरोबर जे नृत्य केले, त्याचा ‘रास’ म्हणण्याचा प्रघात आहे. परंतु या प्रकारच्या नृत्य-नाट्यातून कृष्णाची गोपक्रीडा किंवा इतरही कथाभाग येत असल्याने त्यास ‘रासलीला’ ही संज्ञा प्राप्त झाली असावी.
‘रास’चे वर्णन भागवत पुराणात पाच अध्यायांत सविस्तर आले आहे. कृष्णाच्या मुरलीने बेहोष होऊन गोपी आपले नित्य व्यवहार सोडून त्याच्याबरोबर नृत्य करू लागल्या. प्रत्येक गोपीबरोबर एक-एक कृष्ण अनेक रूपे धारण करून नृत्य करू लागला. हे वर्तुळाकार नृत्य सहा महिने चालले होते, असे हे वर्णन आहे. भागवतातून मूळ प्रेरणा घेऊन नृत्यकारांकडून नृत्य, नटांकडून अभिनय आणि कृष्णाच्या रसपूर्ण आयुष्यातून कथाभाग घेऊन रासलीलेचे तंत्र निर्माण झाले असावे. रासमधील कथोपकथन काव्यमय असते. पुढे कृष्णजीवनावरील चैतन्य महाप्रभू, सूरदास, जयदेव यांसारख्या सिद्धहस्त कवींची मधुराभक्तीपर काव्ये संगीतात बांधून रासलीलेच्या माध्यमातून मांडली गेली.
रासलीलेत नृत्यास विशेष प्राधान्य असते. यातील नृत्याचे साधारणपणे तीन भेद आढळतात. ‘ताल-रासक’ म्हणजे टाळ्या वाजवून केले जाणारे नृत्य ‘दंड-रासक’ म्हणजे हातातील दंड (काठ्या-टिपऱ्या) वाजवून केले जाणारे नृत्य व ‘मण्डल-रासक’ म्हणजे दोन गोपींमध्ये माधव अशा रूपात गोलाकार केले जाणारे नृत्य.
रासलीला नृत्य
थोडक्यात पण महत्त्वाचे.