रामकृष्ण परमहंस (बंगाली : রামকৃষ্ণ পরমহংস) (पूर्वाश्रमीचे नाव गदाधर चट्टोपाध्याय) (फेब्रुवारी १८,१८३६ - ऑगस्ट १६,१८८६) हे एकोणिसाव्या शतकातील भारतात बंगालमध्ये होऊन गेलेले जगद्विख्यात गूढवादी सत्पुरुष होते. स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंसांचे प्रमुख शिष्य होते. आधुनिक भारतीय धर्मप्रबोधनात त्यांनी कामगिरी बजावली. ते त्यांच्या शिष्यांमध्ये ईश्वराचे अवतार मानले जातात.
रामकृष्ण परमहंस ग्रामीण बंगालमधील एका गरीब वैष्णव ब्राह्मण परिवारात जन्मले. कोलकात्याच्या दक्षिणेश्वर काली मंदिरात त्यांनी काही काळ पौरोहित्य केले, त्यानंतर शाक्तपंथीयांच्या प्रभावाने काली आराधना सुरू केली. रामकृष्णांच्या आरंभीच्या काही प्रसिद्ध आध्यात्मिक गुरूंमध्ये भैरवी ब्राह्मणी या साध्वीचा समावेश होतो. तंत्र व वैष्णव भक्तीमध्ये भैरवीला गती होती. नंतर रामकृष्णांच्या म्हणण्यानुसार एका अद्वैत वेदान्तीच्या मार्गदर्शनाखाली त्यांना निर्विकल्प समाधी अनुभवता आली. रामकृष्णांनी इतर धर्मांबाबतही, विशेषतः इस्लाम व ख्रिश्चन धर्माबाबत प्रयोग केले आणि हे सर्व धर्म एकाच ईश्वराकडे घेऊन जातात असे म्हणले.
ग्रामीण बंगाली भाषेतील छोट्या छोट्या कथांचा तेथील जनतेवर बराच प्रभाव पडला. त्यामुळे रूढार्थाने अशिक्षित असतानाही रामकृष्ण बंगाली विद्बज्जन समाजाचे व शिक्षित मध्यमवर्गाचे लक्ष वेधण्यास यशस्वी ठरले. १८७० च्या दशकाच्या मध्यापासून पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या बुद्धिजीवींवर त्यांचा प्रभाव पडला व नंतर ते बंगालमधील हिंदू प्रबोधनाचे उद्गाते ठरले.
सर्व धर्मीयांसाठी त्यांचा “जतो मत, ततो पथ” (जितकी मते, तितके पंथ) हा उपदेश सहिष्णुतेचे प्रतीक आहे. परमहंसांचे खालील उद्गार प्रसिद्ध आहेत.
रामकृष्ण परमहंस
यामागील विज्ञान आणि इतिहास.