रक्त

थोडक्यात पण महत्त्वाचे.

रक्त

रक्त हा लाल रक्त पेशी (आरबीसी किंवा एरथ्रोसाइट्स), पांढऱ्या रक्त पेशी (ल्युकोसाइट्स) आणि बिंबिका (प्लेटलेट्स किंवा थ्रोम्बोसाइट्स) यांनी बनलेला व गुंतागुंतीची (जटिल) रचना असलेला जैविक द्रव पदार्थ आहे. रक्ताचा मुख्य घटक पाणी आहे. रक्त हा एकमेव द्रव उती आहे.

रक्तामध्ये लाल रक्तपेशींचे प्रमाण सर्वाधिक असते. या पेशींमधील हिमोग्लोबिन या घटकामुळे रक्त लाल रंगाचे दिसते. हिमोग्लोबिनमुळे प्राणवायू आणि कार्बन डायॉक्साइड रक्तात विरघळू शकतात आणि त्यांचे वहन करणे सुलभ बनते.

पांढऱ्या रक्त पेशींमुळे संसर्गाला प्रतिबंध होतो तर बिंबिकांमुळे रक्ताची गुठळी होण्यास मदत होते.

पृष्ठ्वंशी प्राण्यांचे रक्त तांबड्या रंगाचे असते. संधिपाद प्राणी आणि मृदुकाय प्राण्यांच्या रक्तामध्ये प्राणवायू वहनानासाठी हिमोग्लोबिनऐवजी हिमोसायनिन असते. कीटक आणि काहीं मृदुकाय प्राण्यामध्ये हिमोलिंफ नावाचा द्रव, प्राणवायू वहनाचे कार्य करतो. हिमोलिंफ बंद रक्तवाहिन्यामध्ये नसते. ते रक्तवाहिन्या आणि शरीर यांच्या मधल्या पोकळ्यांमधून वाहते. बहुतेक कीटकांच्या रक्तामध्ये प्राणवायू वहनासाठी हिमोग्लोबिन सारखा वाहक रेणू नसतो. कीटकांच्या लहान आकारामुळे त्यांच्या शरीरातील श्वासनाल सर्व भागापर्यंत प्राणवायू वहनाचे कार्य करतात.

जंभ पृष्ठवंशी प्राण्यामध्ये पांढऱ्या पेशींवर आधारलेली प्रतिरोधक यंत्रणा असते. या पेशी परजीवी जिवाणूंचा प्रतिकार करतात. बिंबिका या रक्त क्लथन(गोठणे) होण्यासाठी आवश्यक असतात. संधिपाद प्राण्यामध्ये असलेल्या हिमोलिंफ मध्ये असलेल्या हिमोसाइट प्रतिरोधक्षम असतात.

रक्त रक्तवाहिन्यांमधून वाहते. हृदयाच्या साहाय्याने रक्त शरीरभर वाहते ठेवले जाते. त्यासाठी हृदय हे पंपाप्रमाणे कार्य करते. फुप्फुसधारी प्राण्यांमध्ये प्राणवायूयुक्त रक्त रोहिण्यांमधून शरीरास पुरवले जाते. नीलेतील रक्तात कमी झालेल्या प्राणवायूची जागा तेवढ्याच कार्बन डाय ऑक्साइडने घेतलेली असते. श्वास घेतल्यानंतर हवेमधील प्राणवायू फुप्फुसामध्ये रक्तात मिसळतो. उछ्वास सोडताना कार्बन डाय ऑक्साइड फुप्फुसातून बाहेर पडतो.

वैद्यकीय परिभाषेनुसार हीम किंवा हिमॅटो हा शब्द जुन्या ग्रीक भाषेमध्ये वापरतात. शरीरशास्त्र आणि उतीशास्त्रानुसार रक्त हा संयोजी उतींचा एक विशिष्ट प्रकार आहे. रक्ताचा उगम अस्थिमज्जेमध्ये होतो. रक्तामधील फिब्रिनोजेन यकृतपेशींमध्ये तयार होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →