मेहबूब हुसेन पटेल

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

अमर शेख ( ऑक्टोबर २०, १९१६ ते ऑगस्ट २९, १९६९) मूळ नाव मेहबूब हुसेन पटेल महाराष्ट्रातील एक नामवंत शाहीर होते. त्यांच्या आईचे नाव मुनेरबी होते. बार्शी येथील गरीब मुसलमान कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला विलक्षण पल्लेदार, पहाडी आवाजाची निसर्गदत्त देणगी तसेच मराठी लोकगीतांचा समृद्ध वारसा आईकडून लाभला होता.

कॉम्रेड अमर शेख यांच्‍या राजकीय जीवनाची सुरुवात बार्शी येथून झाली. ते प्रथमतः बार्शीमध्‍ये असलेली राजण मिल गिरणीमध्‍ये कामगार होते. तेथे सुरू असलेल्‍या आयटक या केंद्रिय कामगार संघटनेची शाखा त्‍या मिलमध्‍ये होती. त्‍या गिरणीसमोर होत असणारे लढे, गेट सभा, आंदोलने यामुळे प्रभावित होत, त्‍यांना डाव्‍या विचारांची आवड निर्माण झाली. कॉम्रेड रघुनाथ कऱ्हाडकर या कम्‍युनिस्‍ट नेत्‍याच्‍या मार्गदर्शनाखाली ते तेथील कामगारांना संघटित करू लागले पुढे ते भारतीय कम्‍युनिस्‍ट पक्षाचेही सभासद झाले. त्यांनी बार्शीमध्‍ये शेतसारा वाढीविरुद्ध त्यांनी अखिल भारतीय किसान सभेच्‍या नेतृत्‍वाखाली २५ हजारांचा मोर्चा काढला होता.

संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवा मुक्तिसंग्राम यांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. शाहीर अमर शेख यांनी लोककलेच्या माध्यमातून समाजाला जागे करण्याचे व्रत स्वीकारले होते. त्यांच्या लोककलेला क्रांतीची धग होती, म्हणूनच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो, गोवा मुक्ती आंदोलन असो किंवा मुंबईतील गिरणी कामगारांच्या समस्या असोत, त्यांच्या लेखणीने आणि आवाजाने समाजाला जागे केले होते. पोवाडे, गीते, लोकगीते, लोकनाट्ये लिहून विचारांचा प्रसार त्यांनी केला होता. ते नुसतेच मनस्वी कवी नव्हते, तर जनमानसात आदराचे स्थान मिळालेले लोकशाहीर होते. इप्‍टा या डाव्‍या विचारांनी चालत असलेल्‍या सांस्‍कृतीक मंचाची प्रेरणा घेत कॉम्रेड अमर शेखांनी लाल बावटा कला पथकाची स्‍थापना केली होती. यामध्‍ये कॉम्रेड अण्‍णा भाऊ साठे, शाहीर द. ना. गव्‍हाणकर यांची जबरदस्‍त साथ लाभली. अमर शेखा यांची कविता लोकांच्या हृदयात रुजली होती. सामान्यांच्या उत्कर्षासाठी त्यांनी आपली प्रतिभा वेचली. मार्‍क्सवादावर अढळ निष्‍ठा ठेवत संपूर्ण हयात भारतीय कम्‍युनिस्‍ट पक्षात त्‍यांनी काम केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →