मार्गारेट ट्यूडर

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

मार्गारेट ट्यूडर

मार्गारेट ट्यूडर (२८ नोव्हेंबर १४८९ - १८ ऑक्टोबर १५४१) ही राजा जेम्स चौथ्याशी विवाह करून १५०३ ते १५१३ पर्यंत स्कॉटलंडची राणी होती. त्यानंतर तिने आपल्या मुलाच्या अल्पवयात स्कॉटलंडची रीजेंट म्हणून काम केले. मार्गारेट ही इंग्लंडचा राजा हेन्री सातवा आणि यॉर्कची एलिझाबेथ यांची थोरली मुलगी आणि दुसरे आपत्य होती. ती इंग्लंडचा राजा हेन्री आठव्याची मोठी बहीण होती. तिच्या वंशातून पुढे हाऊस ऑफ स्टुअर्टने अखेरीस स्कॉटलंड व्यतिरिक्त इंग्लंडच्या देखील सिंहासनावर ताबा मिळवला.

मार्गारेटने वयाच्या १३ व्या वर्षी जेम्स चतुर्थाशी लग्न केले होते. हा राजकीय विवाह इंग्लंड आणि स्कॉटलंड यांच्यातील शांततेच्या शाश्वत करारानुसार करण्यात आला होता. शांततेच्या शाश्वत कराराच्या अटींनुसार, इंग्लंड आणि स्कॉटलंड यांच्यात "चांगली, वास्तविक आणि प्रामाणिक, खरी, योग्य आणि दृढ शांतता व मैत्री, येणा-या सर्वकाळात टिकून राहण्यासाठी" होते. राजा किंवा त्यांचे कोणीही उत्तराधिकारी दुसऱ्याविरुद्ध युद्ध करणार नाही आणि जर कोणी करार मोडला तर पोप त्यांना बहिष्कृत करेल. एकत्रितपणे, त्यांना सहा मुले होती, परंतु त्यापैकी फक्त एक प्रौढ झाला. मार्गारेटचा जेम्स चतुर्थाशी झालेला विवाह इंग्लंड आणि स्कॉटलंडच्या राजघराण्यांना जोडणारा होता; ज्याचा परिणाम हा एका शतकानंतर युनियन ऑफ द क्राउनमध्ये झाला.

१५१३ मध्ये फ्लॉडनच्या लढाईत जेम्स चतुर्थाच्या मृत्यूनंतर, मार्गारेट, राणी डोवेजर म्हणून, त्यांचा मुलगा, राजा जेम्स पाचवा यांच्यासाठी रीजेंट म्हणून नियुक्त करण्यात आली. पण स्कॉटलंडमधील काही पक्षांनी तिच्या जागी जॉन, ड्यूक ऑफ अल्बानीला रीजेंट म्हणून नेमावे असे सांगीतले. जॉन हा राजाचा सर्वात जवळचा पुरुष नातेवाईक होता जो तेव्हा फ्रांसमध्ये होता. १५१४ मध्ये मार्गारेटने आर्चीबाल्ड डग्लसशी विवाह केला, जो सहावा अर्ल ऑफ एंगस होता. पण ह्यामुळे तिने अनेक सामर्थ्यवान समर्थक दूर केले आणि तिच्या जागी अल्बानीने रीजेंट म्हणून पद सांभाळले. १५२४ मध्ये, मार्गारेटने, हॅमिल्टन कुटुंबाच्या मदतीने, अल्बानीला फ्रान्समध्ये असताना एका उठावात सत्तेतून काढून टाकले, आणि संसदेने तिला रीजेंट म्हणून मान्यता दिली. नंतर तीने राजा जेम्स पाचव्याची मुख्य सल्लागार म्हणून काम केले.

१५२७ मध्ये एंगसपासून घटस्फोट घेतल्यानंतर, मार्गारेटने तिचा तिसरा पती, हेन्री स्ट्युअर्ट, पहिला लॉर्ड मेथवेनशी लग्न केले. १८ ऑक्टोबर १५४१ रोजी मेथवेन कॅसल येथे मार्गारेट मरण पावली. हेन्री रे, यांनी नोंदवले की तिला शुक्रवारी पक्षाघात झाला (शक्यतो स्ट्रोकमुळे) आणि पुढील मंगळवारी तिचा मृत्यू झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →