महाराष्ट्र राज्याच्या निर्मिनंतर १९६२ मध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने एकूण २६४ पैकी २१५ जिंकल्या होत्या. काँग्रेसनंतर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाकडे केवळ १५ जागा होत्या. त्यानंतर प्रजा समाजवादी पक्षाला ९, भारतीय कम्युनिस्ट पक्षाला ६, रिपब्लिकन पार्टीला ३ आणि समाजवादी पक्षाला १ जागा मिळाली. या विधानसभेत १५ अपक्ष आमदारही निवडून आले होते. काँग्रेसला मतांमध्ये ५१.२२ टक्के वाटा मिळाला होता तर शेकापला केवळ ७.४७ टक्के मतांवर समाधान मानावं लागलं होतं.
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेआधी १९५७ मध्ये झालेल्या द्विभाषिक मुंबई प्रांताच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला ३९६ पैकी २६९ जागा मिळाल्या होत्या आणि काँग्रेसचे यशवंतराव चव्हाण मुख्यंत्री झाले. त्यावेळी मुंबई प्रांतात २८२ एकल-सदस्यीय मतदारसंघ तर ५७ द्विसदस्यीय मतदारसंघ होते. पुढे १९६० मध्ये द्विभाषिक मुंबई प्रांताचे विभाजन करून महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन नवीन राज्ये निर्माण करण्यात आली, त्याच वेळी मुंबई प्रांताच्या विधानसभेचेही विभाजन झाले आणि १९६० मध्ये यशवंतराव चव्हाण यांनी पुन्हा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. १९६१ मध्ये भारतातील द्विसदस्यीय मतदारसंघ संपुष्टात आणून नवीन मतदारसंघाची रचना करण्यात आली. १९६२ मध्ये सर्व २६४ मतदारसंघासाठी निवडणुका लढवल्या गेल्या. यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले. या विधानसभेची स्थापना झाल्यावर विधानसभा अध्यक्षपदी बाळासाहेब भारदे यांची निवड झाली. बाळासाहेब भारदे हे सलग दोन विधानसभांसाठी अध्यक्ष होते. १९६२ ते १९७२ असा प्रदीर्घ काळ ते महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष होते. भारत-चीन सीमा संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कृष्ण मेनन यांनी १९६२ मध्ये संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर, पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी यशवंतरावांना ते मंत्रीपद दिले. त्यांच्यानंतर मारोतराव कन्नमवार हे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री झाले. परंतु २४ नोव्हेंबर १९६३ मध्ये त्यांचे मुख्यमंत्री पदावर असतानाच अकाली निधन झाले. मारोतराव कन्नमवार यांच्या आकस्मिक निधनामुळे महाराष्ट्राच्या हंगामी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे बाळासाहेब सावंत यांच्याकडे आली, ते २४ नोव्हेंबर, इ.स. १९६३ ते ५ डिसेंबर, इ.स. १९६३ या कालावधीत महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री होते. त्यानंतर वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९६२
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?