मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन ही मराठी साहित्यातील एक ख्रिस्ती लेखकांद्वारे चालवलेली साहित्यिक चळवळ आहे. दिनांक ९-११ जानेवारी २०२६ ला २७वे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन नाशिक येथे पर पडले. १९२७ पासून हे संमेलन भरते. संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कवी सायमन मार्टिन हे होते. संमेलनाला फादर एरॉल फर्नांडिस हे स्वागताध्यक्ष म्हणून लाभले होते. मराठी ख्रिस्ती परिषदेच्या वतीने आयोजित हे संमेलन विविध चर्चा सत्रे व सांस्कृतिक कार्यक्रमांनी आणि फार उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेचे २६, वे साहित्य संमेलन दिनांक ६, ७ व ८ नोव्हेंबर २०२२ दरम्यान बीड येथे संपन्न झाले. साहित्यिक पौलस वाघमारे हे संंमेलनाचे अध्यक्ष होते तर बीड येथील आल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे आशिष शिंदे स्वागताध्यक्ष होते. तीन दिवसीय संमेलनात परिसंवाद, चर्चिसत्रे, कथाकथन, कविसंमेलन, खुले अधिवेशन आदी उपक्रम उत्साहाने पार पडले.
२३वे अधिवेशन १०-११-१२ मे २०१२, या दिवसांत अहमदनगर येथे भरले होते. संमेलनाध्यक्ष अशोक आंग्रे होते. हे साहित्य संमेलन, इसवी सन १८४२ च्या जून महिन्यापासून अहमदनगर येथून प्रसिद्ध होणाऱ्या, आणि आजतागायत गेली १७० वर्षे अव्याहतपणे चालू असणाऱ्या ज्ञानोदय नियतकालिकातर्फे आयोजित केले जाते.
पहिल्या २३ संमेलनांपैकी आतापावेतो १६ प्रॉटेस्टंटपंथीय ख्रिस्ती लेखकांनी तर केवळ सात कॅथोलिकपंथीय लेखकांनी या साहित्य संमेलनांची अध्यक्षपदे भूषविली आहेत. काही वर्षांपूर्वी ही अध्यक्षपदे दोन्ही पंथातील लेखकांनी आलटून पालटून वाटून घ्यावीत असा अलिखित समझोता झाला होता.
आतापर्यंत महाराष्ट्रातील नाशिक, निपाणी, अहमदनगर, पुणे, बारामती, सोलापूर, मुंबई, मालवण, जालना, नागपूर या विविध ठिकाणी ख्रिस्ती मराठी साहित्य संमेलने भरली. त्यांतील बहुतांशी द्विदिवसीय होती. अध्यक्षस्थानी फादर फ्रान्सिस दिब्रिटो, निरंजन उजगरे, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, डॉ. अनुपमा उजगरे, डॉ. सुभाष पाटील वगैरे साहित्यिक होते.
मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.