भारत क्रिकेट संघाने ऑक्टोबर-नोव्हेंबर १९७८ दरम्यान तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. १९६५ चे भारत-पाकिस्तान युद्ध आणि १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्धामुळे तब्बल १४ वर्षांनंतर भारत आणि पाकिस्तान यांनी एकमेकांविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळली. भारताचा हा दुसरा पाकिस्तान दौरा होता. पाकिस्तानी भूमीवर भारताने पहिल्यांदा एकदिवसीय सामने खेळले. कसोटी मालिकेत पाकिस्तानने २-० असा विजय संपादन केला. हा भारताविरुद्धचा पाकिस्तानचा पहिला कसोटी मालिका विजय ठरला. एकदिवसीय मालिकादेखील पाकिस्तानने २-१ अशी जिंकली. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये सरफ्राज नवाझच्या गोलंदाजीवर सातत्याने बाहेर जाणाऱ्या चेंडूंना पंच वाईड देत नाहीत हे बघून भारतीय संघ संतापला. भारतीय कर्णधार बिशनसिंग बेदी याने निषेध म्हणून संघासह मैदानत्याग केला. आयसीसीने तिसरा सामना पाकिस्तानला बहाल करत विजयी घोषित केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अश्या पद्धतीने निकाल लागलेला हा एकमेव सामना आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९७८-७९
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.