बैकाल सरोवर

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

बैकाल सरोवर

बैकाल सरोवर (रशियन: о́зеро Байка́л; मंगोलियन: Байгал нуур) हे जगातील सर्वात जुने व सर्वात खोल सरोवर आहे. अंदाजे ३ कोटी वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या बैकाल सरोवराची सरासरी खोली ७४४.४ मी (२,४४२ फूट) तर कमाल खोली तब्बल १,६४२ मी (५,३८७ फूट) इतकी आहे. रशियाच्या दक्षिण सायबेरियामध्ये असलेल्या ह्या सरोवरामध्ये जगातील सर्वाधिक गोड्या पाण्याचा साठा आहे (२३,६१५.३९ किमी३ (५,७०० घन मैल)). इतर सरोवरांच्या तुलनेत केवळ कॅस्पियन समुद्राचे घनफळ बैकालपेक्षा अधिक आहे परंतु कॅस्पियन समुद्रामधील पाणी खारे आहे. पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने बैकाल सरोवराचा जगात तिसरा क्रमांक लागतो (सुपिरियर सरोवर व व्हिक्टोरिया सरोवरांखालोखाल).

ऐतिहासिक चिनी पुस्तकांमध्ये बैकालचा उल्लेख उत्तरी समुद्र असा आढळतो. १६४३ साली पहिला रशियन शोधक बैकालपर्यंत पोचला, त्यापूर्वी युरोपीय लोकांना बैकालच्या अस्तित्वाची कल्पना नव्हती. १९व्या शतकाच्या अखेरीस बांधण्यात आलेल्या सायबेरियन रेल्वेमुळे पश्चिम रशियाहून बैकालचा प्रवास करणे सुलभ झाले.

बैकालच्या वायव्येला रशियाचे इरकुत्स्क ओब्लास्त व आग्नेयेला बुर्यातिया प्रजासत्ताक आहेत. बैकालच्या जवळजवळ सर्व बाजूंना डोंगर आहेत. सायबेरियाचा मोती ह्या टोपणनावाने प्रसिद्ध असलेले बैकाल सरोवर एक मोठे पर्यटनकेंद्र आहे व उन्हाळ्यांमधील उबदार महिन्यांत येथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेट देतात.

बैकाल सरोवरामध्ये सुमारे १,७०० विविध प्रकारचे जंतू, प्राणी व वनस्पती आढळतात. जानेवारी ते मे ह्या दरम्यान बैकाल सरोवर गोठलेल्या स्थितीत असते. ह्या काळात सरोवरावरील बर्फाचा थर चालण्यासाठी व वाहने चालविण्यासाठी पुरेसा जाड असतो. १९२० सालच्या रशियन यादवी दरम्यान पांढऱ्या सेनेने सुटकेसाठी जानेवारी महिन्यात बैकाल चालत ओलांडण्याचा निर्णय घेतला परंतु अतिथंड आर्क्टिक वाऱ्यांमुळे पुष्कळसे सैनिक गोठून मृत्यूमुखी पडले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →