पुष्पा गिरिमाजी ह्या एक लेखिका, पत्रकार, ग्राहक हक्क स्तंभलेखिका आणि ग्राहक सुरक्षेच्या समर्थक आहेत. त्या एकमेव भारतीय पत्रकार आहेत ज्यांनी तीन दशकांहून अधिक काळ सतत साप्ताहिक ग्राहक स्तंभ लेखन केले आहे.
गिरिमाजींनी १९७६ मध्ये बंगळूर येथून प्रकाशित होणाऱ्या 'सिटी टॅब' या वृत्तपत्रातून आपल्या पत्रकारितेतील कारकिर्दीला सुरुवात केली. सिटी टॅब नंतर, त्यांनी १९८२ मध्ये बंगळुरूमध्ये डेक्कन हेराल्डमध्ये आणि तदनंतर दिल्ली येथून द इंडियन एक्सप्रेसमध्ये काम केले. १९८३ मध्ये, गिरीमाजी यांनी आपला स्वतःचा ग्राहक स्तंभ आणि त्याचे सिंडिकेशन सुरू केले, जे पुढील वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झाले: द टाइम्स ऑफ इंडिया, गुजरातमधील दिव्य भास्कर, अमर उजाला, दैनिक भास्कर, दैनिक जागरण, आणि संयुक्त कर्नाटक व विजया कर्नाटक, दोन्ही ठिकाणी कन्नड भाषेतून.
२००० ते २००३ पर्यंत त्या विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या (IRDA) पहिल्या सल्लागार समितीच्या सदस्य होत्या आणि अनेक नियमांच्या मसुद्यात, विशेषतः पॉलिसीधारकांच्या हिताच्या संरक्षणावरील नियमनात त्या पूर्णपणे सहभागी होत्या. १९८६ च्या ग्राहक संरक्षण कायद्यात आणि कायद्यातील असंख्य सुधारणांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ग्राहक सुरक्षेच्या क्षेत्रात गिरीमाजी यांच्या कामाची दखल घेऊन, अमेरिकेतील अंडररायटर्स लॅबोरेटरीने त्यांना आपल्या ग्राहक सल्लागार परिषदेचे सदस्य बनवले आहे.
गिरीमाजी यांना त्यांच्या व्यावसायिक कार्यासाठी कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार, संस्कृती पुरस्कार, एमआरपै पुरस्कार आणि चमेलीदेवी जैन पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ८ मार्च २०१८ रोजी नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी २०१७ सालचा नारी शक्ती पुरस्कार पुष्पा गिरिमाजी यांना प्रदान केला. सध्या, गिरीमाजी ह्या दर आठवड्याला दोन खास कॉलम लिहितात - एक हिंदुस्तान टाइम्ससाठी आणि दुसरा द ट्रिब्यूनसाठी.
पुष्पा गिरिमाजी
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.