पहलाज निहलानी

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

पहलाज निहलानी हिंदी दिग्दर्शक-निर्माता आहेत. निहलानी यांनी वयाच्या १४व्या वर्षी चित्रपट वितरक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. १९७५मध्ये त्यांनी स्वतःची चित्रपट वितरण कंपनी सुरू केली तसेच चित्रपट निर्मितीही केली. १९९० च्या दशकात त्यांनी हिंदी चित्रपट अभिनेता गोविंदा याच्याबरोबर ऑंखे, शोला और शबनम अशा अनेक चित्रपटांची निर्मिती केली. निहलानी हे दिग्दर्शक गोविंद निहलानी यांचे कनिष्ठ बंधू आहेत.

पहलाज निहलानी यांची १९ जानेवारी २०१५ रोजी सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. त्यांचा हा कार्यकाळ अनेक वादांनी गाजला. त्यांच्या वादग्रस्त मार्गदर्शक तत्त्वांसाठी ते कायम चर्चेत राहिले. २०१७ सालच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब, इंदू सरकार, लिपस्टिक अंडर माय बुरखा आणि बाबूमोशाय बंदूकबाज या चित्रपटात त्यांनी अनेक दुरुस्त्या सुचवल्या होत्या. काही दिग्दर्शकांनी एकत्र येत पत्रकार परिषदेत घेऊन निहलानींना सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी केली होती. त्यापूर्वीही अनेक कलाकारांनी निहलानींच्या भूमिकेवर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मात्र, निहलानी यांनी कधीच कलाकारांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांना जुमानले नाही. सुरुवातीच्या काळात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ॲक्शन हिरो संबोधून आपल्या राजकीय निष्ठा स्पष्ट केल्या होत्या. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचे असल्याचा आरोपही अनेकदा झाला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →