नॉर्थवेस्ट एरलाइन्स ही अमेरिकेतील मोठी विमानवाहतूक कंपनी होती. इ.स. २००८मध्ये ही कंपनी डेल्टा एरलाइन्समध्ये विलीन झाली.
नॉर्थवेस्टचे मुख्यालय मिनीयापोलिस-सेंट पॉल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ईगन, मिनेसोटा येथे होते. दुसऱ्या महायुद्धानंतर जपानच्या तोक्यो शहरात (सुरुवातीला हानेदा विमानतळ, नंतर नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ) येथे कंपनीने ठाण मांडले व पॅसिफिक क्षेत्रात तिने वर्चस्व निर्माण झाले. युनायटेड एरलाइन्सने १९८५ मध्ये पॅन ॲमचे पॅसिफिक मार्ग ताब्यात घेतल्याला प्रत्युत्तर म्हणून नॉर्थवेस्टने ८८.४ कोटी डॉलर्स देऊन रिपब्लिक एरलाइन्स विकत घेतली आणि त्यानंतर डेट्रॉईट मेट्रोपॉलिटन वेन काउंटी विमानतळ आणि मेम्फिस आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आपले बालेकिल्ले बनवले. या विलीनीकरणामुळे, नॉर्थवेस्टने आपल्या प्रस्थापित पॅसिफिक मार्गांना देशांतर्गत जाळ्याशी जोडले. युरोपमधील धंदा वाढविण्यासाठी १९९३ मध्ये नॉर्थवेस्टने केएलएमसोबत धोरणात्मक युती केली आणि ॲमस्टरडॅम विमानतळ शिफोल येथे संयुक्त युरोपीय ठाणे मांडले.
डेल्टासोबत विलीनीकरण होण्यापूर्वी नॉर्थवेस्ट देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय नियोजित प्रवासी मैलांनुसार जगातील सहावी सर्वात मोठी विमान कंपनी होती आणि अमेरिकेतील देशांतर्गत प्रवासी मैलांनुसार सहावी सर्वात मोठी कंपनी होती. अमेरिकेतील सर्वात मोठ्या देशांतर्गत मार्गांपैकी एक चालवण्यासोबतच, नॉर्थवेस्टने पॅसिफिक महासागरापलीकडे इतर कोणत्याही अमेरिकन कंपनीपेक्षा जास्त प्रवासी (२००४ मध्ये ५.१ दशलक्ष) वाहून नेले आणि इतर कोणत्याही अमेरिकन प्रवासी विमान कंपनीपेक्षा जास्त देशांतर्गत मालवाहतूक केली.
नॉर्थवेस्टसाठी प्रादेशिक आणि आखूड पल्ल्याची विमान सेवा नॉर्थवेस्ट एरलिंक या नावाने बिग स्काय एरलाइन्स, युजीन एव्हिएशन सर्व्हिसेस, एक्सप्रेस एरलाइन्स १/२, फिशर ब्रदर्स एव्हिएशन, मेसाबा एरलाइन्स, नॉर्थईस्ट एक्सप्रेस रिजनल एरलाइन्स, पॅसिफिक आयलंड एव्हिएशन, पिनॅकल एरलाइन्स, प्रिसिजन एरलाइन्स, सिमन्स एरलाइन्स आणि कम्पास एरलाइन्स यांच्याशी झालेल्या कोड शेर करारांनुसार चालवली जात असे. नॉर्थवेस्ट एरलाइन्सची मिडवेस्ट एरलाइन्समध्ये ४०% भागीदारी होती.
नॉर्थवेस्ट एरलाइन्स
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!