नीलिमा क्षत्रिय या मराठी लेखिका असून अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे राहतात. त्यांना लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. पुढे व्यावसायिक व प्रापंचिक जबाबदा-यांमुळे वाचन जरा मागे पडले. परंतु मराठी वाड़मयातील विविध साहित्यधारांच्या अभ्यासाची उर्मी स्वस्थ बसू देईना. मग प्रापंचिक जबाबदा-या कमी झाल्यावर पन्नाशीच्या आसपास मराठी साहित्यात एम. ए केले. त्याचवेळी स्वतःमधील लेखन कौशल्याचा शोध लागला आणि संवेदनशील मनाची स्पंदने व्यक्त करण्याचे साधन हाती आले. तिथूनच साहित्यिक प्रवासाची सुरुवात झाली. दिवस आलापल्लीचे हे त्यांचे पहिले पुस्तक, गडचिरोली जिल्ह्यातील छोटंसं टुमदार गाव आलापल्ली, तिथलं एका लहान मुलीचं बालपण, लहान मुलीच्या नजरेतूनच मांडण्याचा प्रयत्न ह्या पुस्तकातून केला आहे.या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा ललितगद्य, प्रथम प्रकाशनाचा ताराबाई शिंदे पुरस्कार २०१८ मिळाला आहे.
त्यानंतर मुलीच्या अमेरिकेतील वास्तव्यामुळे दोनदा अमेरिकेस जाणे झाले. तिथले वेगळेपण, तिथली भारतीय मानसिकता, मुलीच्या प्रसूतीसाठी गेलेल्या आईची त्रेधा तिरपीट, सगळे शब्दरूप होऊन उमटले आणि "दिवस अमेरिकेचे" तयार झाले. दिवस अमेरिकेचे हे त्यांचे दुसरे पुस्तक. ह्या पुस्तकालाही दत्तात्रेय कृष्ण सांडू प्रतिष्ठानचा साहित्य पुरस्कार मिळाला आहे.
तिसरा विनोदी कथासंग्रह हॉर्न प्लिज ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांच्या शुभ हस्ते प्रकाशित झाला. ह्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा विनोदी लेखनाला दिला जाणारा कै. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार मिळाला आहे.
त्याबरोबरच पाक्षिक , ई-मासिक , वर्तमानपत्र तसेच ‘सरी वर सरी’ या फेसबुक पेज वर लिखाण सुरू आहे.
नीलिमा क्षत्रिय
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?