नरहर दामोदर ऊर्फ नानासाहेब सरपोतदार (जन्म: नांदवली, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, ११ फेब्रुवारी इ.स. १८९६, - पुणे, २३ एप्रिल इ.स. १९४०:) हे मराठी चित्रपटसृष्टीचे एक आद्य शिल्पकार समजले जातात. ते अभिनेते, लेखक व चित्रपट निर्माते होते. ते स्त्री-भूमिकाही करत.
नानासाहेब नोकरी करून शिक्षण घेण्यासाठी मुंबईला गेले, तेथून वयाच्या तेराव्या वर्षीच घर सोडून ते महाराष्ट्र नाटक मंडळीत जाऊन राहिले. तिथे वत्सलाहरण, सैरंध्री, दामाजी या चित्रपटांत छोटया-मोठया भूमिका केल्या. आईच्या आग्रहाखातर, शिक्षणासाठी ते एका नातेवाइकाकडे इंदूरला गेले. तिथेही अभ्यासात त्यांचे लक्ष लागेना. शेवटी नटश्रेष्ठ गणपतराव जोशी यांच्या ओळखीने २१ ऑक्टोबर १९१९ रोजी नव्यानेच स्थापन झालेल्या कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीत ते दाखल झाले.
१९२७ सालच्या विजयादशमीच्या मुहूर्तावर पर्वतीच्या पायथ्याशी, आदमबाग येथे एक रुपया भांडवलावर सरपोतदारांनी आर्यन फिल्म कंपनीची स्थापना केली. आठ आणे जमिनीचे भाडे व बाकी आठ आण्याचे पेढे, नारळ, हार, फुले घेऊन मुहूर्त केला गेला. पुढे चित्रपट प्रदर्शक, मुंबईच्या कोहिनूर थिएटरचे मालक बाबुराव कान्हेरे आर्यन फिल्म कंपनीच्या भागीदारीत आले. सरपोतदार अनुभवी नट, लेखक, दिग्दर्शक होतेच याशिवाय ते छायालेखनही शिकले होते. आता ते निर्मातेही झाले होते. हरहर महादेव हा आर्यनचा पहिला चित्रपट होता, पण चित्रपटाच्या नावावर ब्रिटिश सेन्सॉर बोर्डाने हरकत घेतल्यामुळे त्यांनी नाव बदलून निमक हराम केले.
नाशिकजवळच्या येवळे गावातील अंबू सगुण नावाची मुलगी मूकपटात बालकलाकाराची भूमिका करत असे. नानासाहेबांच्या आर्यन फिल्म कंपतीत प्रथम ती नायिका झाली व पुढे ललिता पवार या नावाने लोकप्रिय झाली. महाराची पोर हा चित्रपट सरपोतदारांनी लिहून दिग्दर्शित केला होता. अंबू ऊर्फ ललिता पवारने महाराजाच्या मुलीची भूमिका केली होती. हा चित्रपट पहायला सरोजिनी नायडू गिरगावातील मॅजेस्टिक सिनेमात आल्या होत्या. या चित्रपटाची महात्मा गांधी, मौलाना शौकत अली, बॅरिस्टर बाप्टिस्टा, अच्युत बळवंत कोल्हटकर आदींनी मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. मद्रासच्या हिंदू, जस्टिस वृत्तपत्रांनी अग्रलेख लिहून सरपोतदारांचे कौतुक केले होते.
नानासाहेब सरपोतदार
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.