दुबई

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

दुबई

दुबई (अरबी: دبي) हे पश्चिम आशियातील संयुक्त अरब अमिराती ह्या देशामधील सर्वांधिक लोकसंख्येचे शहर व अबु धाबीखालोखाल आकाराने दुसऱ्या क्रमांकाची अमिरात आहे. दुबई शहर दुबई अमिरातीच्या उत्तर भागात पर्शियन आखाताच्या दक्षिण किनाऱ्यावर वसले आहे. अबु धाबी व दुबई ह्या दोन अमिरातींना सर्वाधिक राजकीय महत्त्व असून देशाच्या विधिमंडळामध्ये त्यांना नकाराधिकार उपलब्ध आहे. दुबई-अजमान-शारजा ह्या महानगरामधील सर्वात मोठे शहर असलेल्या दुबईची लोकसंख्या २०१३ साली सुमारे २१ लाख होती.

दुबई हे एक जागतिक शहर असून मध्य पूर्व व दक्षिण आशिया भागातील एक महत्त्वाचे व्यापारकेंद्र व वाहतूककेंद्र आहे. १९६० च्या दशकादरम्यान दुबईची जोमाने वाढ होत असताना येथील खनिज तेल साठ्यांचा शोध लागलेला नव्हता. १९६९ साली येथे तेलविक्रीमधून मिळकतीस सुरुवात झाली परंतु इतर अरबी शहरांप्रमाणे येथील अर्थव्यवस्था संपूर्णपणे खनिज तेलावर कधीच अवलंबून नव्हती. सध्या दुबईच्या एकूण अर्थव्यवस्थेमधील केवळ ५ टक्के हिस्सा तेलविक्रीमधून येतो. दुबईने पश्चिमात्य पद्धतीची अर्थनीती स्वीकारल्यामुळे पर्यटन, बँकिंग, स्थावर मालमत्ता इत्यादी बहुरंगी उद्योगांवर दुबईने लक्ष केंद्रित केले आहे. बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत दुबईमध्येच स्थित आहे. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातील आघाडीच्या व वर्दळीच्या विमानतळांपैकी एक आहे. २००८ सालच्या जागतिक मंदीचा फटका दुबईच्या स्थावर उद्योगाला देखील बसला परंतु त्यामधून दुबई बाहेर येत आहे.

आजच्या घटकेला दुबई मध्यपूर्वेतील सर्वात महागडे तर जगातील २२व्या क्रमांकाचे महागडे शहर आहे. २०१४ साली दुबईमधील हॉटेलांचे भाडे जगात दुसऱ्या क्रमांकावर होते (जिनिव्हाखालोखाल). येथील राहणीमानाचा दर्जा उच्च प्रतीचा असून ते निवाससाठी जगातील सर्वोत्तम शहरांपैकी एक मानले जाते. परंतु येथे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या दक्षिण आशियाई कामगार व मजूर वर्गाचे शोषण करून त्यांना अमानुष वागणूक दिल्याच्या वृत्तांमुळे दुबईवर मानवी हक्कांची पायमल्ली केल्याचा देखील आरोप केला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →