आंबवून घट्ट केलेल्या दुधाला दही असे म्हणतात. दुधाचे दही तयार करण्यासाठी दुधात एखाद्या आंबट पदार्थाचे काही थेंब (विरजण) घालतात. घरगुती दही तयार करणे (दही जमवणे) खूप सोपे आहे. त्यासाठी ज्या भांड्यात दही जमवायचे असेल त्या भांड्याला आतून घरात असलेल्या किंवा बाहेरून आणलेल्या आंबट दह्याचा पातळ लेप लावतात. त्यावर कोमट दूध ओततात व ते मिश्रण वरखाली करून चांगल्या प्रकारे एकजीव करतात. उबदार जागेत ठेवल्यावर भांड्यात ओतलेल्या दुधाचे दही बनते. दही बनवायच्या दुधातून तुरटीचा खडा फिरवलेला असल्यास दही निश्चितपणे घट्ट बनते. धातूच्या भांड्यापेक्षा सच्छिद्र मातीच्या भांड्यात दही अधिक चांगले बनते.
स्वादिष्ट बनलेले दही टिकवण्यासाठी त्यात पोटॅशियम मेटा बाय सल्फईट (K2S2O5) किंवा तत्सम रसायन (Sodium Benzoate) वापरण्याची गरज नसते. केवळ थंड जागेत (उदा० रेफ्रिजरेटरमध्ये) ठेवले तरी दही बराच वेळ टिकते. दही हा भारतीयांच्या उन्हाळ्यातल्या जेवणातील एक महत्त्वाचा घटक आहे. रायते, ताक, कढी किंवा कोशिंबीर इत्यादी पदार्थ बनवण्यासाठी दही वापरतात. दह्याचे आरोग्यास बरेच फायदे आहेत. दही पचायला खूप सुलभ असते. ज्यांना दूध पचत नाही त्यांना दही पचते. दही हे प्रोबायोटिक म्हणून कार्य करते. दही खाल्ल्याने प्रतिकारशक्ती सुधारते. तसेच मजबूत हाडे आणि दातांसाठी, निरोगी आणि तेजस्वी त्वचेसाठी ते फायदेशीर आहे .
दही
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?