लासलगावचे प्रथम सरपंच श्री.भिकाजी भागुजी पाटील यांचे द्वितीय सुपुत्र माजी आमदार लोकनेते श्री.दत्ताजी भिकाजी पाटील यांची कौटुंबिक माहिती.
यांचा जीवनपट:
श्री. दत्ताजी भिकाजी पाटील
जन्मतारिख - 26 डिसेंबर 1926
जन्मस्थळ - लासलगाव
वडिल - भिकाजी भागूजी पाटील
आई - हौसाबाई भिकाजी पाटील
पत्नी - लिलाताई दत्ताजी पाटील
पुत्र - श्री.नानासाहेब पाटील,श्री.संजय पाटील
कन्या - शकूबाई,छायाताई,पुष्पाताई
शिक्षण - इंटर महाविद्यालयीन पदवी.
आमदार:- सन 1962 ते 1967, (सन 1967-1972)
पक्ष - राष्ट्रीय काँग्रेस
व्यवसाय - शेती,सिनेमागृह
संघटन - कामगार संघटन,महिला कामगार मंडळ.
मृत्यु - 31 जानेवारी 1996
लोकनेते दादांनी महाविद्यालयीन शिक्षण नाशिक येथे पूर्ण केल्यानंतर,पुढे नोकरी न करता,वडिलोपार्जित पारंपारिक व्यवसाय शेती सांभाळून नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले.स्वातंत्र्यपूर्व काळात 1946 मध्ये लासलगाव मध्ये ग्रामीण जनतेच्या मनोरंजना करीता कमलाकर सिनेमा गृह सुरू केले .हा फार मोठा धाडसी निर्णय होता.वयाच्या एकविसाव्या वर्षी एखाद्या तरुणाने अशा प्रकारच्या अनोख्या व्यवसायात पदार्पण करणे कदाचित काहींना रुचले नसेल. परंतु नाशिक येथे शिक्षण घेत असताना शिक्षणासोबत अनेकविध गोष्टींचा दादांनी अभ्यास केला होता.एकदा निर्णय घेतला कि दादा त्यापासून मागे हटत नसत. हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्ये होते. प्रसंगी काही लोकांबरोबर कटुता आली तरी चालेल परंतु ते आपला निर्णय बदलत नसत.अशाप्रकारे हा अनोखा नवीन व्यवसाय त्यांनी सुरू केला.या काळात नाशिक शहर सोडले तर जिल्ह्यात कोठेही सिनेमागृह नव्हते. वडिलांनी दादांकरिता यथोतीच स्थळ पाहिले.न्यायडोंगरी तालुका - नांदगाव,जिल्हा - नाशिक येथील आहेर परिवारातील कन्या लिलाताई यांच्याबरोबर दादांचा विवाह संपन्न झाला.कौटुंबिक व व्यावसायिक जबाबदारी संभाळून लोकनेते दादा गावातील समाजकारणात सक्रिय होते.तसेच युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांची राजकीय वाटचाल देखील सुरू होती.लोकनेते दादांना एकूण पाच अपत्ये होती त्यापैकी तीन कन्या व दोन सुपुत्र.या सर्वांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण लासलगाव येथे पूर्ण झाले. हे शिक्षण घेत असताना परिसरातील सर्वसामान्य कुटुंबातील,श्रमिक,शेतकरी कुटुंबातील तसेच विविध जाती धर्माची मुलं यांच्यासोबत शिक्षण घेत होती.त्यामुळे सर्वधर्मसमभाव,गरीब-श्रीमंत भेदभाव न करणे इत्यादी मुल्य बालपणापासून या सर्वांमध्ये रुजविली गेली.आई वडील व गुरुजनांच्या संस्कारामुळे सर्व अपत्ये सुसंस्कारित व उच्चविद्याविभूषित झाले.श्रीमंतीचा बडेजाव या पाचही जणांनी कधीच आपल्या वर्तनामध्ये दिसू दिला नाही. साधी राहणी उच्च विचार दादांची जीवनसरणी होती. हीच जीवनसरणी या सर्वांनी अनुकरलेली आपणास दिसून येते.महाविद्यालयीन शिक्षणाकरता लोकनेते दादांनी क्रमाक्रमाने आपल्या अपत्यांना नाशिक येथे पाठवले.महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना ते पत्राद्वारे दर आठवड्याला आपल्या मुलांच्या संपर्कात असत.अशाप्रकारे पत्राद्वारे संवाद सुरू असायचा.
तिन्ही कन्या व लहान सुपुत्र श्री.संजय पाटील यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.मात्र मोठे चिरंजीव श्री.नानासाहेब पाटील यांनी पारंपारिक कला वाणिज्य विज्ञान या महाविद्यालयीन पदवी ऐवजी कृषी पदवी प्राप्त करण्याचे ध्येय निश्चित केले.बारावी विज्ञान नंतर स्वतःच्या गुणांच्या आधारे धुळे येथील शासकीय कृषी महाविद्यालय त्यांनी प्रवेश मिळवला.चार वर्षाचे कृषी पदवीचे शिक्षण त्यांनी मेरीट मध्ये येऊन पूर्ण केले.त्या काळातील लासलगाव मधील ते पहिले कृषी पदवीधर होते.कृषी शिक्षणानंतर त्यांनी वडिलांसोबत शेती व्यवसायाकडे लक्ष दिले.शेती मध्ये आमुलाग्र बदल घडवून आणले.नवनवीन पीक पद्धतींचा अवलंब करण्यास सुरुवात केली.भरघोस उत्पादन देणाऱ्या बियाणांचा वापर सुरू केला.आदर्श पिक पाहणी प्रात्यक्षिकाचे अनेक उपक्रम त्यांनी आपल्या शेतात राबून इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.व हे कार्य अविरत सुरू होते.द्वितीय पुत्र संजय पाटील यांनी वडिलांनी स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू केलेला कमलाकर सिनेमागृहाची जबाबदारी स्वीकारली.लासलगाव सारख्या ग्रामीण भागातील तरुणाईला आकर्षित करण्यासाठी नव्याने निर्माण होणारे चित्रपट ताबडतोब आपल्या सिनेमागृहीमध्ये प्रेक्षकांकरीता कसे उपलब्ध होतील याकरिता त्यांचे सतत प्रयत्न असायचे.मुंबईतील सिनेमा निर्मात्यांशी त्यांनी चांगले संबंध प्रस्थापित केले होते.त्याद्वारे नवनवीन सिनेमा लासलगाव करिता लगेच उपलब्ध होत असत.
शिक्षण संस्कारानंतर पुढील संस्कार आहे विवाह संस्कार.आपली मोठी कन्या शकुबाई यांचा विवाह विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील सावंगा येथील शिंदे घराण्यात झाला.लोकनेते दादा या कालखंडामध्ये विधानसभेत आमदार असल्याने सबंध राज्यात त्यांचा परिचय होता.जावई श्री.शरद व्यंकटेश शिंदे साहेब हे राष्ट्रीय केमिकल फर्टीलायझर या कंपनीत मुंबई येथे मॅनेजर पदावर कार्यरत होते.
द्वितीय कन्या छायाताई यांचा विवाह रानवड येथील रामकृष्ण वाघ (पहिलवान) यांचे चिरंजीव श्री.ज्योतीबा रामकृष्ण वाघ यांच्यासोबत झाला.श्री.ज्योतीबा वाघ हे त्याकाळात नाशिक येथे प्रतीतयश उद्योजक होते.त्यांचा स्वतःचा मोठा उद्योग होता.तसेच रानवड येथे बागायती शेती होती.
तृतीय कन्या पुष्पाताई यांचा विवाह विंचूर येथील दादांचे समवयस्क मित्र श्री.माधव भाऊ दरेकर यांचे चिरंजीव डॉ.सुरेश माधव दरेकर यांच्या बरोबर संपन्न झाला.डॉक्टर सुरेश दरेकर यांचा वैद्यकिय व्यवसाय लासलगाव मध्येच होता.
मोठे चिरंजीव श्री नानासाहेब पाटील यांचा विवाह टाकळी ता.कोपरगाव जि.अहमदनगर येथील कै.विश्वनाथ कोंडाजी देवकर यांची कन्या व कै.धोंडीराम विश्वनाथ देवकर श्री.तबासाहेब विश्वनाथ देवकर श्री.अशोक विश्वनाथ देवकर यांच्या भगिनी रंजनाताई यांच्याबरोबर संपन्न झाला.तसेच लहान चिरंजीव श्री.संजय पाटील यांचा विवाह अहमदनगर जिल्ह्यातील पाथरे बु.ता.राहता येथील कडू परिवारातील कै.एकनाथराव सयाजी कडू यांची कन्या व श्री.शंकरराव एकनाथराव कडू व श्री.सयाजी एकनाथराव कडू यांच्या भगिनी नीताताई यांच्या समवेत संपन्न झाला.
अशाप्रकारे लोकनेते दत्ताजी पाटलांनी समाजकारण-राजकारण विविध धार्मिक जबाबदाऱ्या सांभाळून कुटुंबाकडे ही तितकेच लक्ष देऊन मुलांचे शिक्षण , त्यांचे विवाह,त्यांचा उद्योग व्यवसाय या सर्व जबाबदाऱ्या आदर्श पिता म्हणून पार पाडल्या.आपल्या संस्काराची शिदोरी त्यांनी मुलांना दिली. या सर्वात त्यांना मोलाची साथ लाभली ती म्हणजे त्यांच्या सहचारिणी लिलाबाई पाटील यांची. खांद्याला खांदा देत समर्थपणे त्या दादांच्या सोबत सतत उभ्या राहिल्या.
लासलगावकर व परिसरातील नागरिक आजही पाटील कुटुंबाचा आदर्श इतरांना जरूर सांगतात.
दत्ताजी भिकाजी पाटील
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.