त्रिज्यी

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

त्रिज्यी

त्रिज्यी(इंग्रजीत रेडियन) हे कंस आणि त्रिज्येतील गुणोत्तर आहे. त्रिज्यी हे कोन मोजण्याचे सामान्य एकक असून ते गणितातल्या अनेक शाखांमध्ये वापरले जाते. हे एकक पूर्वाश्रमीचे (S.I.=इंटरनॅशनल सिस्टिम ऑफ युनिट्स्)एस. आयचे पुरवणी एकक होते, परंतु १९९५ मध्ये हा वर्ग रद्द करण्यात आला आणि सध्या त्या वर्गातल्या एककांना एस. आय.चे साधित एकक असे म्हणतात. त्रिज्यीला इंग्रजीमध्ये radian (रेडियन) म्हणले जाते. हे (समतल) सपाट कोनाचे एकक आहे. घन कोनासाठी चौत्रिज्यी हे एस. आय. एकक आहे.

त्रिज्यी हे rad किंवा c चिन्हाने दाखविले जाते. उदा १.२ त्रिज्यीचा कोन १.२ rad असा दाखवितात. c हे अक्षर circular measure (सर्क्युलर मेज्हर - वर्तुळीय मापन) ह्या अर्थाने वापरले जाते व ते अंकाच्या उजव्या बाजूला किंचित वर लिहिले जाते. उदा. १.२c. अंश(उदा० 1.2°) हे जसे कोनाचे माप आहे तसेच त्रिज्यीसुद्धा आहे. त्रिज्यी हे दोन लांबींचे गुणोत्तर असल्याने तो एक शुद्धांक आहे, म्हणून त्याला एकक चिन्ह लावले नाही तरी चालते. त्यामुळे बऱ्याच गणिती लेखनामध्ये rad किंवा c ही चिन्हे लावली जात नाहीत. अंशाचे चिन्ह नसले की तो कोन त्रिज्यीमध्ये मोजला गेला आहे असे गृहीत धरले जाते. मराठीत त्रिज्यी हे माप त्रि ह्या चिन्हाने दाखविले जाते. उदा. १.२ त्रिज्यी हा १..२ त्रि असा दाखवितात आणि जेव्हा कोनाचे माप अंशात असते तेव्हा ° हे चिन्ह आवर्जून वापरले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →