जेडी व्हान्स

या विषयावर तज्ञ बना.

जेडी व्हान्स

जेम्स डेव्हिड व्हान्स (जन्मनाव: जेम्स डोनाल्ड बोमन; २ ऑगस्ट, १९८४:मिडलटाउन, ओहायो, अमेरिका - ) हे एक अमेरिकन राजकारणी, वकील, लेखक आणि माजी सैनिक आहेत. हे २०२३ पासून ओहायोमधील अमेरिकेचे सेनेटर आहेत. व्हान्स रिपब्लिकन पक्षाकडून २०२४ च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत उपाध्यक्षपदाचे उमेदवार आहेत.

मिडलटाउन हायस्कूलमधून १२वी उत्तीर्ण झाल्यावर व्हान्स यूएस मरीन कोरमध्ये सामील झाले. तेथे त्यांनी २००३ ते २००७ दरम्यान युद्ध वार्ताहर म्हणून काम केले. यातील सहा महिने ते इराकमध्ये होते. त्यानंतर त्यांनी ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला आणि २००९मध्ये पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी २०१३मध्ये येल लॉ स्कूलमधून कायद्याची पदवी मिळवली. २०२३ च्या निवडणुकींमध्ये व्हान्स रिपब्लिकन पक्षाकडून ओहायोमधील अमेरिकेचे सेनेटर म्हणून निवडून गेले.

त्यांनी आपले लहानपण आणि शिक्षण व त्याकाळची कठिण परिस्थिती यावर हिलबिली एलिजी नावाचे पुस्तक लिहिले आहे. २०१६ अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीदरम्यान या पुस्तकाला मोठी प्रसिद्धी मिळाली. २०२०मध्ये रॉन हॉवर्डने या पुस्तकावर आधारित चित्रपट बनवला.

२०१६ च्या निवडणुकांमध्ये व्हान्स यांनी रिपब्लिकन उमेदवार (आणि नंतर राष्ट्राध्यक्ष) डॉनल्ड ट्रम्प यांना मोठा विरोध केला होता परंतु नंतर त्यांनी आपली भूमिका बदलली व ते ट्रम्पचे प्रमुख पाठीराखे झाले. जुलै २०२४मध्ये ट्रम्प यांनी व्हान्सची २०२४ च्या निवडणुकीत आपले उपराष्ट्राध्यक्षीय उमेदवार म्हणून निवड केली. अमेरिकेतील प्रमुख पक्षाकडून असे नामांकन मिळेलेले व्हान्स हे पहिलेच मरीन कोरचे सैनिक आहेत.

सामाजिक मुद्द्यांमध्ये, व्हान्स गर्भपात, समलिंगी विवाह, अल्पवयीन मुलांसाठी लिंगबदलाला आणि बंदूक नियंत्रणाला विरोध करतात. हे पुराणमतवादी धोरणांना प्रोत्साहन देतात. व्हान्स युक्रेनला रशियाविरुद्ध लढण्यासाठी अमेरिकन लष्करी मदत देण्याला विरोध करतात. व्हान्स यांचे इतर काही विचार अमेरिकेतील रिपब्लिकनांपेक्षा वेगळे आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →