भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ

या विषयातील रहस्ये उलगडा.

भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ

हा लेख पुरुष संघाबद्दल आहे. महिला संघासाठी, भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ पहा.



भारताचा पुरुष राष्ट्रीय क्रिकेट संघ पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतो. भारतीय क्रिकेट संघ भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) द्वारे शासित असून कसोटी, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI) आणि आंतरराष्ट्रीय टी२० (T20I) दर्जा असलेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचा (आयसीसी) पूर्ण सभासद आहे. भारतीय संघ सध्याचा टी२० विश्वविजेता आहे.

भारतीय संघाने आजवर खेळलेल्या ५८२ कसोटी सामन्यांपैकी १८० सामन्यांमध्ये विजय मिळवला असून १७९ सामने गमावले आहेत. उर्वरित सामन्यांपैकी २२२ अनिर्णित राहिले तर १ बरोबरीत सुटला आहे. २० ऑक्टोबर २०२४ पर्यंत, भारत १२१ रेटिंग गुणांसह आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने पहिल्या दोन आवृत्त्यांमध्ये (२०२१, २०२३) आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला आहे.

कसोटी स्पर्धांमध्ये बॉर्डर-गावस्कर चषक (ऑस्ट्रेलियाविरुद्ध), फ्रीडम चषक (दक्षिण आफ्रिकेविरुद्ध), अँथनी डि मेलो चषक आणि पतौडी चषक (इंग्लंडविरुद्ध) यांचा समावेश होतो.

संघाने १,०५८ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यामधील ५५९ सामन्यांमध्ये विजय, ४४५ सामन्यांमध्ये पराभव, १० सामन्यांमध्ये बरोबरी उर्वरित ४४ सामने अनिर्णित राहिले आहेत. जून २०२४पर्यंत, भारत १२२ रेटिंग गुणांसह आयसीसी एकदिवसीय चॅम्पियनशिपमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. भारतीय संघाने १९८३, २००३, २०११, २०२३मध्ये चार वेळा विश्वचषकाच्या अंतिम फेरी गाठण्यामध्ये यशस्वी झाला आहे आणि त्यापैकी १९८३ आणि २०११ अशा दोनदा विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद मिळविण्यात संघाला यश आले. विश्वचषक जिंकणारा हा दुसरा संघ होता (वेस्ट इंडीज नंतर) आणि २०११ मध्ये स्पर्धा जिंकल्यानंतर मायदेशात विश्वचषक जिंकणारा भारतीय संघ पहिलाच होता. भारताने २००२ आणि २०१३ मध्ये दोनदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. याशिवाय, त्यांनी १९८४, १९८८, १९९०-९१, १९९५, २०१०, २०१८ आणि २०२३ अशा ७ वेळा एकदिवसीय आशिया चषक जिंकला आहे.

राष्ट्रीय संघाने आजपर्यंत २३८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यापैकी १५७ जिंकले, ६९ गमावले आहेत, ६ बरोबरी आणि ६ सामने अनिर्णित राहिले आहेत. जूलै २०२४ पर्यंत, भारत आयसीसी आंतरराष्ट्रीय टी२० चॅम्पियनशिपमध्ये २६७ रेटिंग गुणांसह प्रथम क्रमांकावर आहे. भारताने २००७ आणि २०२४ मध्ये दोनदा आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक विजेतेपदाला गवसणी घातली आहे. त्यांनी २०१६ मध्ये ट्वेंटी२० आशिया चषक आणि २०२२ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा जिंकल्या आहेत.

२०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चॅम्पियनशिप जिंकणारा भारत सध्याचा टी२० विश्वचषक चॅम्पियन आहे. त्यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी, बीसीसीआयने संपूर्ण ४२ सदस्यीय तुकडीसाठी एकूण १२५ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →