शालिवाहन राजा हाल(हल) सातवाहन (इसवी सन पूर्व २०० ते इस २०० ) याने केलेल्या गाथारूपी लोककाव्याच्या व काही स्वतः रचलेल्या गाथांच्या एकत्रित संग्रहास गाहा सत्तसई अथवा गाथासप्तशती असे म्हणतात.
गाहा सत्तसई हा, इतर संशोधकांसोबतच स.आ. जोगळेकर यांच्या मतानुसार महाराष्ट्री प्राकृत भाषेत असलेला आणि महाराष्ट्रात रचना झालेला कालानुक्रमे आद्यग्रंथ आहे,तर त्याच्या गुणांनी अग्रगण्य आहे. संशोधक डॉ.सुकथनकर यांच्या मतानुसार "गाथा सप्तशती हा प्राकृत वाड्मयातील आद्य व अग्रगण्य ग्रंथ आहे; प्राचीन व बहुमोल सुभाषितांचा संग्रह आहे, साहित्यशास्त्रज्ञांनी त्यातील वचने उद्धृत केली आहेत; रसिक पंडितांनी त्यावर टीका लिहिल्या आहेत."
गाथासप्तशती मधील प्रत्येक गाथा स्वयंपूर्ण आहे आणि त्यात मानवीय भावना, व्यवहार आणि प्राकृतिक दृष्यांचे अत्यंत सुरस आणि सौंदर्यपूर्ण चित्रण आहे. निसर्गचित्रणात विंध्य पर्वत आणि गोला (गोदावरी) नदीचा पुनःपुनः उल्लेख येतात. खेडी, शेतकऱ्यांचे ग्रामीण जीवन, उपवन, झाड़ी, नदी, विहिरी, तलाव इत्यादीसोबत पुरुष-स्त्रियांचे विलासपूर्ण व्यवहार आणि प्रणयभावनेच विलोभनीय आविष्कार या ग्रंथात आहे.प्रेमाच्या विविध अवस्थाही मार्मिकपणे शब्दांकित केलेल्या आहेत. ह्या गाथांतून सुंदर निसर्गचित्रेही वैपुल्याने आढळतात. त्यांशिवाय होलिकोत्सव, मदनोत्सव ह्यांसारखे विशेष प्रसंग; तसेच विविध व्रते, आचारादींची वर्णनेही त्यांतून येतात.
महाराष्ट्रातील तत्कालीन समाजजीवनाचे प्रतिबिंब या गाथांतून आढळून येते.
गाहा सत्तसई
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!