टॉलेमिक इजिप्तची शेवटची शासक क्लिओपात्रा ७वीचा मृत्यू १० किंवा १२ ऑगस्ट, इ.स.पूर्व ३० तारखेला अलेक्झांड्रियामध्ये झाला. तेव्हा ती ३९ वर्षांची होती. प्रचलित समजुतीनुसार, क्लिओपात्राने आस्प या इजिप्शियन सापाद्वारे दंश करून घेऊन स्वतःला ठार केले होते. परंतु रोमन काळातील लेखक स्ट्रॅबो, प्लुटार्क आणि कॅसियस डिओ यांच्या मते, क्लिओपात्राने विषारी मलम वापरून किंवा हेअर पिन सारख्या तीक्ष्ण वस्तूला विष लावून आत्महत्या केली असावी.
आधुनिक विद्वानांना सर्पदंश हे तिच्या मृत्यूचे कारण असलेल्या प्राचीन अहवालांवर शंका आहे. त्यांच्या मते तिचा कदाचित खून झाला होता. तिचा रोमन राजकीय प्रतिस्पर्धी ऑक्टाव्हियनने तिला तिच्या पसंतीच्या पद्धतीने आत्महत्या करण्यास भाग पाडले होते, असेदेखील काही तज्ज्ञ मानतात. क्लियोपेट्राच्या थडग्याचे स्थान अज्ञात आहे. ऑक्टाव्हियनने तिला आणि तिचा नवरा- रोमन राजकारणी व जनरल मार्क अँटोनी, ज्याने स्वतःवर तलवारीने वार केले होते, या दोघांना एकत्र पुरण्याची परवानगी दिल्याची नोंद केली गेली.
क्लिओपात्राच्या मृत्यूमुळे रोमन प्रजासत्ताकाचे अंतिम युद्ध संपुष्टात आले, जे ऑक्टाव्हियन आणि अँटोनी यांच्यात सुरू होते. या युद्धाध्ये क्लियोपात्रा ही तिच्या तीन मुलांचा पिता असलेल्या अँटोनीसोबत होती. इ.स.पूर्व ३१ मध्ये रोमन ग्रीस येथे झालेल्या ऍक्टियमच्या लढाईत पराभव झाल्यानंतर अँटनी आणि क्लियोपात्रा इजिप्तला पळून गेले. त्यानंतर ऑक्टाव्हियनने इजिप्तवर आक्रमण करून त्यांच्या सैन्याचा पराभव केला. आत्महत्या केल्याने ऑक्टाव्हियनच्या लष्करी विजयाच्या उत्सवात कैदी म्हणून परेड होण्याचा क्लिओपात्राला स्वतःचा अपमान टाळता आला. ही परेड ऑक्टाव्हियन काढणार होता, जो इ.स.पूर्व २७ मध्ये रोमचा पहिला सम्राट होणार होता आणि ऑगस्टस म्हणून ओळखला जाणार होता. ऑक्टाव्हियनजवळ क्लियोपात्राचा मुलगा सीझेरियन होता (ज्याला टॉलेमी १५वा म्हणूनही ओळखले जाते), जो इजिप्तमध्ये ठार मारला गेलेल्या ज्युलियस सीझरचा प्रतिस्पर्धी वारस होता. परंतु ऑक्टाव्हियन याने तिच्या मुलांना व अँटोनीला देखील वाचवले आणि या सर्वांना रोमला आणले. क्लिओपात्राच्या मृत्यूने हेलेनिस्टिक कालखंड आणि इजिप्तच्या टॉलेमिक राजवटीचा अंत होऊन रोमन इजिप्तची सुरुवात झाली, जो रोमन साम्राज्याचा एक प्रांत बनला.
क्लियोपात्राच्या मृत्यूचे चित्रण इतिहासात विविध कलाकृतींमध्ये अनेकदा केले गेले आहे. यामध्ये व्हिज्युअल, साहित्य आणि कार्यप्रदर्शन कला, शिल्प आणि चित्रांपासून कविता व नाटके तसेच आधुनिक चित्रपटांचा समावेश आहे. प्राचीन लॅटिन साहित्यातील गद्य आणि काव्यात क्लिओपात्रा ठळकपणे चित्रित केली गेली आहे. व्हिज्युअल आर्ट्समध्ये तिच्या मृत्यूचे प्राचीन रोमन चित्रण दुर्मिळ असले तरी तिच्या मृत्यूवर मध्ययुगीन, पुनर्जागरण, बारोक आणि आधुनिक कलाकृती असंख्य आहेत. एस्क्विलिन व्हीनस आणि स्लीपिंग एरियाडसारखी अनेक प्राचीन ग्रीक-रोमन शिल्पे ही तिच्या मृत्यूचे चित्रण करणाऱ्या नंतरच्या कलाकृतींसाठी प्रेरणा बनली. या कलाकृतींमध्ये एस्पीच्या सर्पदंशाचा सर्वत्र समावेश होता. क्लिओपात्राच्या मृत्यूने कामुकता आणि लैंगिकता या विषयांना जन्म दिला आहे. यामध्ये विशेषतः व्हिक्टोरियन काळातील चित्रे, नाटके आणि चित्रपटांचा समावेश आहे. क्लिओपात्राच्या मृत्यूचे चित्रण करणाऱ्या आधुनिक कलाकृतींमध्ये निओक्लासिकल शिल्पकला, ओरिएंटलिस्ट चित्रकला आणि सिनेमा यांचा समावेश होतो.
क्लिओपात्राचा मृत्यू
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?