क्राइमिया (युक्रेनियन: Автономна Республіка Крим; रशियन: Автономная Республика Крым; क्राइमियन तातर: Qırım Muhtar Cumhuriyeti, Къырым Мухтар Джумхуриети) हा पूर्व युरोपातील एक वागद्रस्त भूभाग आहे. मार्च २०१४ सालापर्यंत युक्रेन देशाचे एक स्वायत्त प्रजासत्ताक असलेले क्राइमिया सध्या रशियाच्या अधिपत्याखाली आहे. क्राइमिया युक्रेनच्या दक्षिणेस व रशियाच्या नैऋत्येस काळ्या समुद्राच्या उत्तर किनाऱ्यावर क्राइमिया ह्याच नावाच्या द्वीपकल्पावर वसले आहे.
क्राइमियाच्या इतिहासात अनेक महासत्तांचा समावेश आहे. १५व्या ते १८व्या शतकादरम्यान हा भूभाग ओस्मानी साम्राज्याच्या तर १८व्या ते विसाव्या शतकादरम्यान रशियन साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता. दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी जर्मनीने हा प्रदेश बळकावला व युद्धानंतर सोव्हिएत संघाच्या राजवटीदरम्यान क्राइमिया आधी सोव्हिएत रशिया व नंतर सोव्हिएत युक्रेनचा राजकीय विभाग होता.
२६,१०० वर्ग किमी क्षेत्रफळ असलेल्या क्राइमिया प्रजासत्ताकाची लोकसंख्या २००७ साली सुमारे २० लाख इतकी होती. सिंफेरोपोल ही क्राइमियाची राजधानी व सर्वात मोठे शहर तर सेव्हास्तोपोल, याल्ता व कर्च ही इतर मोठी शहरे आहेत. पर्यटन व शेती हे येथील प्रमुख उद्योग आहेत.
क्रिमियाचे स्वायत्त प्रजासत्ताक
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?