* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात.
कोरेगावची लढाई (अन्य नावे: कोरेगाव भिमाची लढाई, भिमा कोरेगावची लढाई) ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भिमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई १ जानेवारी, इ.स. १८१८ रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठा महासंघाच्या पेशवा गटामध्ये झाली होती. ब्रिटिशांच्या बाजूने एकूण ८३४ सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टॉंटन करीत होता. इंग्रजांच्या सैनिकांत 'बॉम्बे नेटिव लाइट इन्फेंट्री तुकडी'चे सुमारे ५०० महार जातीचे सैनिक होते, काही युरोपियन व इतर काही सैनिक होते. तर मराठ्यांच्या बाजूने २८,००० सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव दुसरे करीत होते. मराठ्यांच्या सैनिकांत मराठा, अरब व गोसाई या सैनिकांचा समावेश होता.
दुसरे बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वाखालील सैन्य कंपनीच्या ताब्यात असलेल्या पुण्यावर हल्ला करण्याच्या मार्गावर असताना, अनपेक्षितपणे त्यांना कंपनीचे सैन्य आडवे आले, जे पुण्यातील ब्रिटिश सैन्याला मदत देण्यासाठी निघाले होते. पेशव्यांनी कोरेगावात घुसखोरी करणाऱ्या सैन्यावर हल्ला करण्यासाठी सुमारे २,००० सैनिक पाठवले. कॅप्टन फ्रान्सिस स्टॉन्टन यांच्या नेतृत्वाखालील कंपनीच्या सैन्याने जवळजवळ १२ तास लढाई केली. मोठ्या ब्रिटिश सैन्याच्या आगमनाच्या भीतीने पेशव्यांच्या सैन्याने शेवटी माघार घेतली.
ही लढाई इंग्रज-मराठा युद्धाच्या मालिकेतील तिसऱ्या इंग्रज - मराठा युद्धाचा भाग होती. या युद्धाच्या मालिकेने पेशव्यांची राजवट संपली. यानंतर पुढे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जवळजवळ संपूर्ण पश्चिम, मध्य आणि दक्षिण भारतात पसरली गेली.
पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते व महारांना,अत्यंत हीन वागणूक दिली जात असे, याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मासाठी ब्रिटिशांच्या बाजूने पेशवे व मराठ्यांविरूद्ध लढले आणि विजयी झाले. १८०० च्या दशकांत पुण्याचे पेशवे, ग्वाल्हेर संस्थानाचे शिंदे, इंदूरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड आणि नागपूरचे भोसले असे अनेक तुकड्यांत मराठा साम्राज्य विभागलेले होते, त्यापैकी ग्वाल्हेर, इंदूर, बडोदा व नागपूर हे मराठा साम्राज्याचे गट ब्रिटिश साम्राज्यात सामील झालेली होती.
कोरेगाव भिमाच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी ७५ फूट उंच विजयस्तंभ उभारून त्यावर कंपनीच्या ४९ सैनिकांची नावे कोरली. यामध्ये २० शहीद व ३ जखमी महार सैनिकांची नावे आहेत. या स्तंभावर लिहिले आहे — ‘One of the Triumphs of the British Army of the Earth’.
महार सैनिकांच्या सन्मानार्थ येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी १ जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरातून बौद्ध (विशेषतः पूर्वाश्रमीचे महार), अन्य दलित, शीख व इतर जातीचे लोकही लाखोंच्या संख्येने येत असतात. बुद्धमूर्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा समोर ठेवून बुद्धवंदना घेऊन शहीद सैनिकांच्या जयस्तंभाला मानवंदना दिली जाते.
कोरेगावची लढाई
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.