कॅथलीन डॉइल बेट्स (२८ जून १९४८) ही अमेरिकन चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री आहे. आपल्या ५० वर्षांपेक्षा अधिक काळाच्या कारकीर्दीत तिला ऑस्कर पुरस्कार, दोन एमी पुरस्कार, दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि दोन स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड पुरस्कार मिळालेले आहेत. तिला टोनी पुरस्कार आणि दोन बाफ्टा पुरस्कारांसाठी नामांकन देखील मिळाले आहे.
मेम्फिस, टेनेसी येथे जन्मलेल्या, तिने अभिनय कारकीर्द करण्यासाठी न्यू यॉर्क शहरात जाण्यापूर्वी दक्षिण मेथोडिस्ट विद्यापीठात नाटकाचा अभ्यास केला. टेक ऑफ (१९७१) मधील तिच्या पहिल्या ऑन-स्क्रीन भूमिकेत निवड होण्यापूर्वी तिने किरकोळ रंगमंचावर भूमिका केल्या होत्या. तिची पहिली ऑफ-ब्रॉडवे स्टेज भूमिका व्हॅनिटीज (१९७६) नाटकात होती. १९७० आणि १९८० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात तिने पडद्यावर आणि रंगमंचावर काम करणे सुरूच ठेवले आणि नाईट, मदर (१९८३) या नाटकातील सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेत्रीसाठी टोनी पुरस्काराचे नामांकन मिळवले. फ्रँकी अँड जॉनी इन द क्लेअर डी ल्युन (१९८८) नाटकामधील तिच्या भूमिकेसाठी तिला ओबी पुरस्कार मिळाला.
थ्रिलर मिझरी (१९९०) मधील ॲनी विल्क्सच्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार मिळाला. हा चित्रपट स्टीफन किंगच्या कादंबरीवर आधारीत होता ज्यात तिने ॲनी विल्क्सचे पात्र साकारले होते. अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूट ने त्यांच्या "१०० हिरो आणि व्हिलन" यादीत ॲनी विल्क्सचा समावेश केला, तिला १७ व्या क्रमांकाच्या प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून स्थान दिले आणि सहाव्या क्रमांकाचा खलनायक म्हणुन नोंद मिळाली. प्राइमरी कलर्स (१९९८), अबाउट श्मिट (२००२) आणि रिचर्ड ज्वेल (२०१९) मध्ये तिच्या इतर ऑस्कर-नामांकित भूमिका होत्या ज्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते. फ्राइड ग्रीन टोमॅटोज (१९९१), डोलोरेस क्लेबोर्न (१९९५), टायटॅनिक (१९९७), द वॉटरबॉय (१९९८), रिव्होल्युशनरी रोड (२००८), द ब्लाइंड साइड (२००९), आणि मिडनाईट इन पॅरिस (२०११) या तिच्या इतर उल्लेखनीय चित्रपटांचा समावेश आहे.
बेट्स टेलिव्हिजनवरील तिच्या व्यापक कामासाठी देखील ओळखली जाते. तिने टू अँड अ हाफ मेन (२०१२) च्या नवव्या सत्रासाठी कॉमेडी मालिकेतील उत्कृष्ट अतिथी अभिनेत्रीचा पहिला एमी पुरस्कार जिंकला आणि अमेरिकन हॉरर स्टोरी: कोव्हेन (२०१३) मधील डेल्फीन ला लॉरीच्या भूमिकेसाठी (न्यू ऑर्लिन्सची एक सीरियल किलर) लघु मालिका किंवा चित्रपटातील उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी तिचा दुसरा एमी पुरस्कार जिंकला. द लेट शिफ्ट (१९९६), ॲनी (१९९९), सिक्स फीट अंडर (२००३), वॉर्म स्प्रिंग्स (२००५), हॅरीज लॉ (२०११-२०१२), अमेरिकन हॉरर स्टोरी: फ्रीक शो (२०१४) आणि अमेरिकन हॉरर स्टोरी: हॉटेल (२०१५) या सर्वांमध्ये तिच्या इतर एमी-नामांकित भूमिका होत्या.
तिने डॅश अँड लिली (१९९९), फार्गो (२००३) आणि ॲम्ब्युलन्स गर्ल (२००५) हे चित्रपट दिग्दर्शीत केले आहे.
कॅथी बेट्स
या विषयावर तज्ञ बना.