कृष्णदेव मुळगुंद

या विषयातील रहस्ये उलगडा.

कृष्णदेव बिंदुमाधव मुळगुंद (जन्म : २७ मे १९१३; मृत्यू ११ मे २००४) हे नृत्यदिग्दर्शक, लेखक, कवी, नाटककार, चित्रकार टाकाऊतून टिकाऊ अशी वेषभूषा करणारे आणि शिक्षक असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाभलेले साक्षात कलामूर्ती होते.

नृत्यकार कृष्णदेव मुळगुंदांचे घराणे मूळचे कर्नाटकातले होते. त्यांना कलेचा वारसा असा नव्हता; पण लहानपणापासून चित्रकला, नाटक, नृत्य, संगीत यांची आवड मात्र होती. मुळगुंद पुण्यात आले आणि स्थिरावले. रेणुकास्वरूप (तेव्हा मुलींचे भावे स्कूल) या शाळेत शिक्षकी करता करता मुळगुंदांनी आपल्या कलेचा संसार उभा केला.

कृष्णराव मुळगुंदांची पत्‍नी मंगला ह्याही शिक्षिका आणि कलावंत होत्या.

मुळगुंदांनी अनेक नृत्य नाटिका बसविल्या. घाशीराम कोतवाल ही त्यांची सर्वोत्कृष्ट कलाकृती. त्या नाटकात मुळगुंदांच्या दिग्दर्शनाखाली नाना फडणविसांची भूमिका करणाऱ्या नटाने केलेला नाच लाजवाब होता. बाबासाहेब पुरंदरे यांच्या ’जाणता राजा’ची सर्व कलात्मक बाजू कृष्णराव मुळगुंदांनी सांभाळली होती. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी आपल्या चित्रकृतींचे प्रदर्शन पुण्याच्या बालगंधर्व कलादालनात भरविले होते.

कृष्णदेवांनी ज्या ज्या नाट्यकृतीचे नृत्यदिग्दर्शन केले, त्यांतील काही संगीतिका, काही ऑपेरा तर काही नाटके आहेत. कृष्णदेवांनी सुमारे तीस लोकनृत्यांचे गीतलेखन, दिग्दर्शन केले आहे. एवढेच नव्हे; तर वेषभूषाही कृष्णदेवप्रणीत होती. कृष्णदेव मुळगुंदांनी एकूण २० नाटकाचे लेखन केले, त्यांपैकी १० भावनाट्ये आहेत.

पुण्यातील भरत नाट्य मंदिराने मुळगुंद यांची अनेक बालनाट्ये प्रायोजित केली. रोहिणी हट्टंगडी (माहेरच्या रोहिणी ओक), एस.एस.सी.ला पहिला आलेला दीपक माहुलीकर यांच्यासारखे बालकलाकार त्यांच्या बालनाट्यात काम करीत असत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →