कृष्णकांत दळवी

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

कृष्णकांत दळवी (जन्म : अडकूर, १५ फेब्रुवारी, इ.स. १९२४; - अडकूर (तालुका चंदगड), ४ ऑक्टोबर, इ.स. २०१५) हे एक मराठी नाटक-चित्रपटांत काम करणारे अभिनेते होते. ते मास्टर दत्ताराम यांचे चेले होते. ते अभिनेते चेतन दळवी यांचे काका होते. ते पार्श्वगायकही होते.

रेल्वेतील नोकरीच्या निमित्ताने कृष्णकांत दळवी मुंबईत आले आणि नोकरी करता करता त्यांनी अभिनयाची आवड जोपासली. देखणे आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्व असल्यामुळे त्यांना चित्रपट आणि रंगभूमी अशा दोन्हीकडे भूमिका मिळत गेल्या. गिरणगाव, कामगार रंगभूमी आणि लोकरंगभूमी या त्या काळातल्या कलाकार घडवणाऱ्या शाळाच होत्या. कृष्णकांत दळवी यांनी शाहीर साबळे यांच्या कलापथकात काम केले. ज्या काळात सबंध कार्यक्रमाची बिदागी तीस रुपये मिळायची, तेव्हा ते नाइटचे पाच रुपये घ्यायचे आणि त्यावेळी त्यांची मागणी दहा रुपयांची होती, यावरून साठच्या सुमारास ते किती महत्त्वाचे कलावंत होते हे लक्षात येते.

'रायगडाला जेव्हा जाग येते' या नाटकामध्ये त्यांनी १९६२मध्ये वयाच्या ३७व्या वर्षी संभाजी साकारला. ही भूमिका त्यांनी १९८८पर्यंत म्हणजे २५ वर्षांहून अधिक काळ रंगविली. या नाटकाचे एक हजारांहून अधिक प्रयोग झाले. दळवी यांना त्यांच्या कार्यासाठी १९९४मध्ये मास्टर नरेश पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

१९ डिसेंबर १९७९ रोजी रंगभूमीवर आलेल्या 'मृत्युंजय' नाटकाचीची निर्मिती ठाण्याचे रमाकांत राक्षे यांनी केली होती. मात्र, प्रयोग सुरू असतानाच त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर मोहन वाघ आणि प्रभाकर पणशीकर हे दोन बलदंड निर्माते आपल्या संस्थेतर्फे हे नाटक करण्यास इच्छुक होते. मात्र, या नाटकात कर्णाची भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेता बाळ धुरी यांच्या प्रयत्‍नाने ते मोहन वाघ यांच्या 'चंद्रलेखा' संस्थेकडे चालून आले. त्यांनीही नाटकाची देखणी निर्मिती केली. या नाटकातली बाळ धुरी यांची प्रमुख भूमिका जशी लक्षणीय ठरली तशीच ख्यातनाम अभिनेता श्रीकांत मोघे यांची दुर्योधनाची भूमिका प्रचंड गाजली. मोघे यांच्यानंतर कृष्णकांत दळवी यांनी ती भूमिका साकारली.

’बारा वर्षे सहा महिने तीन दिवस” या चित्रपटात ते पार्श्वगायक होते.

दळवी ज्या काळात सक्रिय होते, तेव्हा चित्रपट तंत्रदृष्ट्या प्रगत नव्हते, त्यामुळे सारी भिस्त दिग्दर्शक, संवादलेखक आणि मुख्य अभिनेत्यावर असायची. अशा काळात त्यांनी यशस्वी मराठी चित्रपट दिले. रेल्वेमधून १९८३ मध्ये निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी रंगभूमीशी नाते टिकवले. अखेरच्या काळात मात्र ते जन्मगावी परतले आणि तिथेच अखेरचा श्वास घेतला.

कृष्णकांत दळवी हे कृष्णधवल आणि रंगीत चित्रपटांच्या युगाला जोडणारे तसेच रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांमध्ये तेवढ्याच आत्मविश्वासाने वावरलेले अभिनेते होते.

त्यांचे मागे त्यांचे कुटुंब दीपक आणि ज्योती आणि पत्नी सौ साधना दळवी. उदय दळवी मोठा मुलगा ह्यांचे navy मध्ये अपघातात १९७८ साली अकाली निधन झाले व पत्नी ही २०२० साली स्वर्गवासी झाल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →