ही एक एक भारतीय आदिवासी जमात आहे. केरळमधील पालघाट जिल्ह्यात व तमिळनाडूमधील चित्तूर व कोईमतूर ह्या जिल्ह्यांत ह्या जमातीचे लोक राहतात. त्यांची लोकसंख्या सुमारे २,५०० होती (सन १९६१). काळा रंग, दणकट प्रकृती, पसरट नाक, जाड ओठ, कुरळे आणि लांब केस ही त्यांची शरीरवैशिष्ट्ये होत. स्त्रियांप्रमाणे पुरूषही केस वाढवून त्यांची मानेमागे गाठ बांधतात. स्त्रियांना रंगीत कपड्यांची आवड असते. संमिश्र तमिळ व मलयाळम् भाषा ते बोलतात.
त्यांच्यात निरनिराळ्या कुळी आहेत; पण व्यवस्थित कुळी नाही. अनीतिमान स्त्रियांना पूर्वी ठार मारीत असत; पण सध्या अशा स्त्रियांना जातीबाहेर टाकण्यात येते. त्यांच्यात पितृसत्ताक कुटुंबपद्धती आहे. स्त्रीपुरूषांना समाजात समान दर्जा असला, तरी धार्मिक विधींत स्त्रियांना पुरूषांच्या बरोबरीने भाग घेता येत नाही. प्रथम ऋतुदर्शन, मासिकपाळी व बाळंतपण ह्यावेळी स्त्रियांना अशुद्ध समजण्यात येते. यावेळी काही ठराविक काळापर्यंत त्यांना मुख्य वस्तीपासून थोड्या अंतरावर असलेल्या स्वतंत्र झोपडीत (मुत्ताचाल) ठेवण्यात येते.
मुलगी वयात आल्यानंतर आईवडलांच्या संमतीने तिचा विवाह होतो. विवाह मुलीच्या घरी व शक्य तो सोमवारीच होतो. मेहुणीविवाह या जमातीत मान्य आहे. पण आते-मामे भावंडविवाह मात्र निषिद्ध समजतात. वधूमूल्य एक रूपयापासून तीस रूपयांपर्यंत देण्याची पद्धत आहे. बहुपतित्व त्यांना मान्य नाही; पण बहुपत्नीत्त्वाची पद्धत अस्तित्त्वात आहे. विधवेला विधुराशीच विवाह करण्यास मान्यता आहे. बालविवाहपद्धतही आढळते. आपल्या सभोवती सदैव भूत-पिशाचांचे अस्तित्त्व असते, अशी त्यांची कल्पना असून त्यांना शमविण्यासाठी ते निरनिराळे प्राणी, वनस्पती ह्यांची पूजा करतात. शेतातील कामास सुरुवात करण्यापूर्वी, झोपडी बांधण्यापूर्वी अगर कोणत्याही साहसाच्या प्रारंभी ते काली, कन्निमार, करूप्परायन, वल्यमूर्ती इ. देवतांची पूजा करतात. ओणम्, विशु भट्टू व पोंगळ हे सण व उत्सव ते साजरे करतात. मृतांना ते दक्षिणोत्तर पुरतात. पंधरा दिवस सुतक पाळतात व सोळाव्या दिवशी सर्व जमातबंधूंना जेवण देतात.
पूर्वी शिकार करणे व कंदमुळे गोळा करणे हेच एरवल्लनांचे मुख्य व्यवसाय होते. तथापि सध्या हे लोक शेतमजुरी व शहरांतून मोलमजुरीही करू लागले आहेत.
एरवल्लन
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?