एकनाथ आव्हाड हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बालसाहित्यकार व कथाकथनकार आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत गेली ३१ वर्षे ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मुलांसाठी कथा, कविता, नाट्यछटा, चरित्र, काव्यकोडी असं विविध प्रकारचं लेखन ते करीत आहेत. मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी कथाकथन, काव्यवाचनाचे कार्यक्रम सादर करीत असतात. कथाकथनाचे ५०० हून अधिक कार्यक्रम त्यांनी सादर केलेले आहेत. कथाकथनातील योगदानाबद्दल अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचा 'महाराष्ट्रातील उत्कृष्ट कथानिवेदक पुरस्कार' सरांना सन्मानित करण्यात आले आहे.
'कथाकथन तंत्र आणि मंत्र' ही कथाकथनाची कार्यशाळा त्यांनी अनेक ठिकाणी घेतलेली आहे. आव्हाड यांची एकूण ३२ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.
बोधाई, गंमत गाणी, अक्षरांची फुले, शब्दांची नवलाई, छंद देई आनंद, पाऊस पाणी हिरवी गाणी हे बालकवितासंग्रह, आनंदाची बाग, एकदा काय झालं!, खळाळता अवखळ झरा, आपले सण आपली संस्कृती हे बालकथासंग्रह, मजेदार कोडी, आलं का ध्यानात?,खेळ आला रंगात हे काव्यकोडी संग्रह, मला उंच उडू दे हा नाट्यछटासंग्रह, मिसाईल मॅन हे चरित्र... ही त्यांच्या काही पुस्तकांची ठळक नावे. त्यांच्या काही पुस्तकांचे हिंदी, इंग्रजी भाषांत आणि ब्रेल लीपीत अनुवाद झालेले आहेत. आव्हाड सरांची इयत्ता दुसरी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात 'चांदोबाच्या देशात' ही कविता आणि इयत्ता सहावी सुलभभारतीच्या पाठ्यपुस्तकात 'बाबांचं पत्र' हा धडा तसेच इयत्ता पहिली बालभारतीच्या उर्दू माध्यमाच्या पुस्तकात 'शेतकरीदादा ' ही कविता... इत्यादी साहित्य महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तक मंडळाने पाठ्यपुस्तकात समाविष्ट केले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड या विद्यापीठात आव्हाड यांचा 'आनंदाची बाग' हा बालकथासंग्रह एम.ए. मराठी प्रथम वर्ष अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे.
एकनाथ आव्हाड यांना त्यांच्या 'गंमत गाणी' या जोडाक्षर विरहित बालकवितासंग्रहास महाराष्ट्र शासनाचा वा.गो.मायदेव उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार (२००८ साली), 'शब्दांची नवलाई' या त्यांच्या बालकवितासंग्रहास महाराष्ट्र शासनाचा बालकवी उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार (२०२०साली) प्राप्त झाला आहे तसेच महाराष्ट्र शासनाचा सृष्टीमित्र साहित्य पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.
मुंबई महानगरपालिकेचा आदर्श शिक्षक जिल्हा पुरस्कार (२००८ साली)
महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार (२०१६ साली) त्यांना मिळाले आहेत. यांसह इतरही नामांकित साहित्य व शैक्षणिक संस्थांचे मानाचे पुरस्कार त्यांना लाभलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा भारत सरकारचा अतिशय प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार २०२३ साली त्यांना प्राप्त झाला आहे.
आतापर्यंत ८ राज्यस्तरीय बालकुमार मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविलेले असून आव्हाड यांच्या एकूण बालसाहित्यावर पाच विद्यार्थी पीएच. डी. चा अभ्यास करीत आहेत.
एकनाथ आव्हाड
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?