अश्विनी धोंगडे

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

अश्विनी धोंगडे

डाॅ. अश्विनी रमेश धोंगडे (जन्म : पुणे, २१ जानेवारी १९४७) ह्या एक मराठी स्त्रीवादी लेखिका आहेत. त्‍यांनी तीन कविता संग्रह, सहा कादंबऱ्या, दोन प्रवास वर्णने, तीन टीकात्मक लेखसंग्रह, लहान मुलांसाठी १५-२० बालपुस्तके आणि इतर विषयांवर १९ पुस्तके लिहिली आहेत. एम.ए. (इंग्रजी) झाल्यावर १९७१ पासून त्यांनी एस.एन.डी.टी. महाविद्यालयात इंग्लिशच्या प्राध्यापिका म्हणून काम केले. पुढे ‘जाहिरातींची भाषाशैली’ (Linguistic Analysis of Commercial Display Advertisements) या विषयात डॉक्टरेट केली. तसेच इंग्रजीची प्रबंध मार्गदर्शिका व परीक्षक म्हणून काम केले.

अश्विनी धोंगडे या कथालेखक द.के. बर्वे यांच्या कन्या होत. वडील हे लेखक आणि दिलीपराज प्रकाशनचे मालक असल्याने अनेक लेखकांचे त्यांच्या घरी जाणे येणे असे. आश्विनी धोंगडे पाचवी ते सहावीत असताना त्यांनी लिहिलेल्या कविता आणि लेख नववी आणि दहावीच्या मुलांना वाचून दाखविले जात असत. महाविद्यालयात असताना त्यांनी दोन दैनिकांसाठी लेख लिहिले. त्या लेखक रमेश वामन धोंगडे यांच्या पत्नी आहेत.

अश्विनी धोंगडे उत्तर कोरियात एका शिष्टमंडळाच्या सभासद म्हणून गेल्या होत्या. त्यावर त्यांनी 'देशांतर' हे प्रवास वर्णन लिहिले तसेच फिनलंडच्या प्रवासावर त्यांनी मध्यरात्रीच्या सूर्याचा देश हे पुस्तक लिहिले.

अश्विनी धोंगडे यांनी लिहिलेल्या 'स्त्रीवादी स्वरूप आणि उपयोजना' या पुस्तकाच्या सहा आवृत्त्या प्रकाशित झाल्या. एम.ए.च्या अभ्यासक्रमात त्याचा समावेश आहे.

त्यांनी अनेक ठिकाणे स्त्रियांचे प्रश्न आणि स्त्रियांचा दर्जा याबद्दल २०० हून अधिक व्याख्याने दिली आहेत.

त्यांनी लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत 'अजुनी चालतेची वाट' ह्या सदराचे लेखन २०१५ मध्ये वर्षभर केले.

लॅंग्वेज अँड जेन्डर या अमेरिकन पाठ्यपुस्तकात त्यांच्या एका कवितेचा समावेश करण्यात आला आहे.

अश्विनी धोंगडे या सासवड येथे २०१८ साली भरलेल्या २१व्या आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →