एकच प्याला हे राम गणेश गडकरी यांनी लिहिलेले मराठीतील नाटक आहे. मद्यपान व त्याचे दुष्परिणाम हा विषय असलेले हे नाटक गडकऱ्यांनी इ.स. १९१७ सालच्या सुमारास लिहिले. गंधर्व नाटक मंडळीने याचा पहिला प्रयोग २० फेब्रुवारी, इ.स. १९१९ रोजी बडोद्यात, तर बलवंत संगीत मंडळीने याचा पहिला प्रयोग ६ फेब्रुवारी, इ.स. १९२० रोजी सोलापुरात केला . गडकऱ्यांनी आपले ‘एकच प्याला’ हे तिसरे नाटक १९१७ च्या नोव्हेंबरमध्ये लिहून पुरे केले; तथापि ते नाटक ‘गंधर्व नाटक मंडळी’च्या रंगभूमीवर गडकऱ्यांच्या मृत्यूनंतर दहा-अकरा महिन्यांनी आले. त्यात वि. सी. गुर्जरांनी नंतर पदं लिहिली. या नाटकातली सिंधू बालगंधर्व साकारणार होते, त्यामुळे आणि तेव्हाच्या रिवाजानुसार नाटक संगीत होणार होते, यात वादच नव्हता. उलट गडकऱ्यांनी नारायणराव राजहंसांना, तुम्हाला फाटके लुगडे नेसायला लावीन, असे सांगूनच ठेेवले होते असे म्हणतात; ह्या नाटकाचे कथानक ऐकूनच बालगंधर्वांनी अशा भूमिकेसाठी गोणपाट घालूनही काम करायची माझी तयारी आहे, असे त्यांना उत्तर दिले होते.
दारूच्या व्यसनामुळे सुधाकरसारखा एक बुद्धिमान, तेजस्वी आणि स्वाभिमानी माणूस स्वतःचा, आपल्या साध्वी पत्नीचा आणि आपल्या संसाराचा कसा नाश करून घेतो, ही भयानक गोष्ट गडकऱ्यांनी प्रभावी भाषेतूननी रोमांचकारी घटनांमधून प्रेक्षकांना परिणामकारक रीतीने सांगितलेली आहे. मद्यपानाच्या व्यसनाची अत्यंत मूलभूत आणि शास्त्रीय मीमांसा गडकऱ्यांनी लालित्यपूर्ण आणि नाटय़पूर्ण भाषेत या नाटकात केली आहे.
एकच प्याला
थोडक्यात पण महत्त्वाचे.