पहिला हेन्री तथा हेन्री बोक्लर्क ( सुमारे १०६८ - १ डिसेंबर, ११३५) हा ११०० ते ११३५ मध्ये त्याच्या मृत्यूपर्यंत इंग्लंडचा राजा होता. तो विल्यम द कॉन्कररचा चौथा मुलगा होता आणि त्याने लॅटिन आणि उदारमतवादी कलांमध्ये शिक्षण घेतले होते. १०८७ मध्ये विल्यमच्या मृत्यूनंतर हेन्रीचे मोठे भाऊ रॉबर्ट कुर्थोज आणि विल्यम रुफस यांना अनुक्रमे नॉर्मंडी आणि इंग्लंडचा वारसा मिळाला. हेन्री यावेळी परागंदा झाला. कालांतराने त्याने पश्चिम नॉर्मंडीमधील कोटेंटिन काउंटी रॉबर्टकडून विकत घेतली, परंतु त्याच्या भावांनी त्याला १०९१ मध्ये पदच्युत केले. त्याने हळूहळू कोटेंटिनमध्ये आपला पाय रोवला केला आणि रॉबर्टविरुद्ध विल्यम रुफसशी युती केली.
विल्यम रुफसचा शिकार करताना अपघाती मृत्यू झाल्यावर हेन्रीने रॉबर्टच्या आधी इंग्लंडच्या सिंहासनावर कब्जा केला. आपल्या राज्याभिषेकाच्या वेळी विल्यमच्या अनेक बदनाम धोरणांमध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन दिले. त्याने स्कॉटलंडच्या मॅटिल्डाशी लग्न केले आणि त्यांना सम्राज्ञी मॅटिल्डा आणि विल्यम अॅडेलिन अशी दोन मुले झाली. रॉबर्टने हेन्रीच्या इंग्लंडच्या राजेपदावर आक्षेप घेतला घातला आणि ११०१ मध्ये नॉर्मंडीमधून आक्रमण केले. या युद्धाचा शेवट वाटाघाटी आणि समझोत्यात झाला. त्यानुसार हेन्री राजा म्हणून मान्यता मिळाली. ही शांतता अल्पकाळ टिकली आणि हेन्रीने ११०५ आणि ११०६ मध्ये नॉर्मंडीवर आक्रमण केले आणि टिंचब्रेच्या लढाईत रॉबर्टचा पराभव केला. हेन्रीने रॉबर्टला आयुष्यभर तुरुंगात डांबून ठेवले. त्यानंतर फ्रान्सचा लुई सहावा, फ्लँडर्सचा सातवा बाल्डविन आणि अँजूचा पाचवा फुल्क यांनी हेन्रीच्या नॉर्मंडीवरील नियंत्रणाला आव्हान दिले आणि रॉबर्टचा मुलगा विल्यम क्लिटो राजा असल्याचे जाहीर केले. ब्रेमुलेच्या लढाईत हेन्रीच्या विजयानंतर ११२० मध्ये शेवटी शांति पसरली.
११२० च्या व्हाईट शिप आपत्तीत हेन्रीचा मुलगा विल्यम बुडाल्याने उत्तराधिकाराबद्दल शंका निर्माण झाली. आपल्याला दुसरा मुलगा होईल या आशेने हेन्रीने लुवेनच्या अॅडेलिझाशी लग्न केले परंतु त्यांना मूल झाले नाही. यानंतर त्याने आपली मुलगी मॅटिल्डा हिला आपली वारस घोषित केले आणि तिचे लग्न अंजूच्या जेफ्रीशी केले. हेन्री आणि या जोडप्यामधील संबंध ताणले गेले आणि त्यांच्यात अँजूच्या सीमेवर लढाई झाली. या दरम्यान आठवडाभर आजारी राहिल्यानंतर १ डिसेंबर, ११३५ रोजी हेन्री मृत्यू पावला. जरी मॅटिल्डा अधिकृत वारस असल तरी ब्लॉइसच्या स्टीवनने सत्ता बळकावली. त्यानंतर झालेली यादवी याला अराजकता म्हणून ओळखले जाते.
इंग्लंडचा पहिला हेन्री
थोडक्यात पण महत्त्वाचे.