इंग्लंडचा तिसरा हेन्री

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

इंग्लंडचा तिसरा हेन्री

तिसरा हेन्री (इ.स. १२०७ - इ.स. १२७२) हा इंग्लंडचा एक राजा होता. त्याची कारकीर्द १२१६ ते १२७२ होती.

तिसऱ्या हेन्रीच्या राजवटीपासून इंग्लंडचे नॉर्मन राजे स्वतःला इंग्लिश राजे मानू लागले असे म्हणले जाते. हेन्रीचे राज्य कमकुवत होते पण या राजवटीतील सर्वात लक्षणीय गोष्ट म्हणजे हेन्री व त्याच्या प्रजेत झालेले यादवी युद्ध होय. एव्हाना नॉर्मन घराण्याचे फ्रांसमधील राज्य कोलमडून पडले होते व त्यांची हद्द आज ज्याला इंग्लंड म्हणले जाते त्या परिसरापुरतीच मर्यादित राहिली होती. आपल्या या उर्वरीत जमीनीवर आपली स्वतःची छाप उमटवावी म्हणून हेन्रीने अनेक बांधकामे हाती घेतली. यातले सर्वात महत्त्वाचे म्हणजे आज ज्यास वेस्टमिन्स्टर ॲबी म्हणले जाते ते लंडनमधील चर्च होय. याशिवाय त्याने लंडनच्या किल्ल्याचा विस्तार केला व सॅलिसबरीचा किल्लादेखील बांधला. परंतु या सर्व बांधकामामुळे सरकारची बरीचशी संपत्ती खर्च झाली व या खर्चामुळे जॉनच्या, माग्ना कार्टाच्या, वेळीस पहिल्यांदा उफाळून आलेला राजा व प्रजेतील वाद पुन्हा एकदा चिघळला. यावेळेस मात्र या वादाने मोठे उग्र रूप धारण केले. तत्कालिन इंग्लंडमधल्या लहान खेड्यांपासून ते लंडनसारख्या महानगरापर्यंत शेतमजुरांपासून सरदारांपर्यंत लोक हेन्रीच्या उधळपट्टीच्या विरोधात उभे राहिले.

इंग्लंडचे हे पहिले यादवी युद्ध होय. यावेळेस इंग्लंडच्या इतिहासात पहिल्यांदाच इंग्लंड एक गणराज्य बनण्याच्या जवळ येऊन ठेपले. या कलहात प्रजेचा मुख्य सायमन डी मन्टफट हा सरदार होता. १२६४ मध्ये झालेल्या लढाईत मंटफटने हेन्रीचा मुलगा एडवर्ड यांस कैद केले, व हेन्री आणि त्याची पत्नी इलिनॉर यांना लंडनच्या किल्ल्यात बंदिस्त केले. पुढच्याच वर्षी मंटफटने लंडनमध्ये प्रजेच्या वतीने पार्लमेन्ट भरवली. आज जगातील सगळ्या लोकशाही देशांमध्ये सत्तेची प्रमुख भूमिका निभावणाऱ्या या संस्थेचा अशा रितीने जन्म झाला. या सुमारास इंग्लंडचा राजा हेन्री असला तरी खरी सत्ता मंटफटच्याच हातात होती. पण केवळ अठराच महिन्यात परिस्थिती पालटली. एडवर्डने मंटफटच्या कैदेतून पळून जाऊन स्वतःचे सैन्य उभे केले व एका लढाईत मंटफटला ठार मारले. अशी रितीने इंग्लंडचे पहिले यादवी युद्ध संपले व हेन्री पुनश्च इंग्लंडच्या गादीवर आला.

१२७२ साली त्याच्या मृत्यूनंतर एडवर्ड इंग्लंडचा राजा झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →