२०२६ फिफा विश्वचषक

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

२०२६ फिफा विश्वचषक

२०२६ फिफा विश्वचषक हा २३वा आणि चालू फिफा विश्वचषक आहे. ही फिफाच्या सदस्य देशांच्या राष्ट्रीय संघांद्वारे खेळली जाणारी एक चतुर्वार्षिक आंतरराष्ट्रीय पुरुष फुटबॉल स्पर्धा आहे. या स्पर्धेची सुरुवात ११ जून २०२६ रोजी झाली असून याचा समारोप १९ जुलै रोजी होईल. या स्पर्धेचे संयुक्त यजमानपद १६ शहरांकडे आहे—यांतील ११ शहरे अमेरिकेत, ३ शहरे मेक्सिकोमध्ये आणि २ शहरे कॅनडामध्ये आहेत. तीन यजमान देश असलेला हा पहिलाच फिफा विश्वचषक आहे. आत्तापर्यंतच्या ३२-संघां ऐवजी ४८ संघांचा समावेश असणारी ही पहिलीच विस्तारित स्पर्धा आहे.

२००२ च्या विश्वचषकानंतर अनेक देशांनी यजमानपद घेतलेला हा पहिलाच विश्वचषक आहे. मेक्सिकोने यापूर्वी १९७० आणि १९८६च्या स्पर्धांचे आयोजन केले होते व त्यामुळे तीन वेळा विश्वचषकाचे यजमानपद किंवा सह-यजमानपद असलेला हा पहिला देश झाला. अमेरिकाने यापूर्वी १९९४ मध्ये विश्वचषकाचे आयोजन केले होते. कॅनडा पहिल्यांदाच स्पर्धेचा यजमान/सह-यजमानपद देश आहे. कतारमधील २०२२ च्या विश्वचषकानंतर ही स्पर्धा पुन्हा तिच्या पारंपारिक जून-जुलैच्या वेळापत्रकात परतली आहे; कतारमधील अतिउष्णतेमुळे २०२२ चा विश्वचषक नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये आयोजित करण्यात आला होता.

यजमान देश म्हणून कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिका हे तिन्ही संघ स्वयंचलितपणे या स्पर्धेसाठी पात्र ठरले. केप व्हर्डे, क्युरासाओ, जॉर्डन आणि उझबेकिस्तान या देशांनी या स्पर्धेतून विश्वचषकात पदार्पण केले. अर्जेंटिना हा गतविजेता संघ आहे, ज्याने २०२२ मध्ये स्वतःचे तिसरे विश्वचषक विजेतेपद पटकावले होते. २५ जून २०२६ रोजी, एकूण प्रेक्षकांची संख्या ३६,०५,३५७ वर पोहोचली, ज्यामुळे फिफा विश्वचषकाच्या इतिहासातील ही सर्वाधिक प्रेक्षक संख्या ठरली. या विक्रमाने अमेरिकेतच आयोजित झालेल्या १९९४ च्या विश्वचषकाचा पूर्वीचा विक्रम मोडीत काढला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →