हुआन पुयोल गार्सिया (Spanish: Juan Pujol García), (१४ फेब्रुवारी, इ.स. १९१२ - १० ऑक्टोबर, इ.स. १९८८) हा एक, एकाच वेळी परस्पर विरोधी पक्षांकरता हेरगिरी करणारा गुप्तहेर होता.
हुआन पुयोल गार्सियाने दुहेरी हेरगिरीचे (डबल एजंट) काम जाणीवपूर्वक पत्करले. त्याचे ब्रिटिश टोपणनाव (संकेताक्षर) गार्बो तर जर्मन संकेतनाव अराबेल होते. दोन्ही राष्ट्रांच्या गुप्तहेरसंस्थांना तो आपलाच गुप्तहेर वाटे. त्याला त्याच्या हेरगिरीबद्दल दोन्ही बाजूंनी पुरस्कारही मिळाले होते. ब्रिटिशांकडून मोस्ट एक्सेलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा पुरस्कार दिला तर जर्मनांकडून त्याला आयर्न क्रॉस पुरस्कार दिला गेला.
दुसऱ्या महायुद्धाच्या थोडेसेच आधी झालेल्या, स्पॅनिश यादवी युद्धातील कम्युनिस्ट आणि फॅसिस्ट दोन्ही पक्षांवर जुआन पुजोल गार्स्या नाराज होता. म्हणून दोस्त राष्ट्रांच्या बाजूने त्याची मनोभूमिका बनत गेली. पुयोल व त्याच्या पत्नीला ब्रिटन व अमेरिका अशा दोन्ही देशांच्या गुप्तचर संघटनांनी सामावून घेण्यास नकार दिला. तरी त्याने हार न मानता, त्या काळात हिटलर - मुसोलिनी मैत्री अक्ष उदयास येऊ लागलेला असताना, कट्टर नाझी समर्थक व (नाझींच्या मदत व सहानुभूतीने सत्तेवर आलेल्या) स्पॅनिश सरकारचा हस्तक अशी स्वतःची प्रतिमा निर्माण केली व तो जर्मन हेर म्हणून नियुक्त झाला.
जर्मन हेर झाल्यानंतर त्यास ब्रिटनला जाऊन इतर हेरांची भरती करण्यास सांगण्यात आले. पण तो पोर्तुगालची राजधानी लिस्बन इथे गेला. तिथून प्रत्यक्षात थापा असलेले काही बनावट रिपोर्ट त्याने पाठविले . असले थापाडे रिपोर्ट बनवूनही तो धरला गेला नाहीच, उलट जर्मनांच्या नजरेत विश्वासार्ह झाला. मग त्याने स्वतःसारखेच इतर काही सब-एजंट बनवण्यास सुरुवात केली; फक्त त्या सब एजंटाचे अस्तित्त्व पूर्णतः त्याच्या कल्पनेतले होते. ह्या काल्पनिक एजंटांवर तो पुढे चुकांचे, उशीरा खबर देण्याचे खापर फोडणार होता. अशा कामगिरीमुळे दोस्तांनाही शेवटी पुजोलचा मैत्रीचा हात स्वीकारावाच लागला. त्याला आता दोस्तांतर्फे सहकुटुंब ब्रिटनला पाठवण्यात आले. त्याचा बॉस/सहकारी टॉमस हॅरिस आणि तो स्वतः अशा दोघांनी उर्वरित युद्धकाळात गुप्तहेरांचे काल्पनिक जाळे सुरुवातीस पत्राने आणि मग रेडियोमार्गे वाढवत ठेवले.
पुयोलची मोलाची ठरलेली कामगिरी म्हणजे ऑपरेशन फोर्टिट्यूड. ह्या ऑपरेशनचे उद्दिष्ट एकच. जर्मनांना दोस्तांच्या नॉर्मंडीवरील आक्रमणाबद्दल अनभिज्ञ ठेवणे व जमेल त्या मार्गाने त्याबद्दल जर्मनांची दिशाभूल करणे. पुयोलने मुद्दाम दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे जर्मन पास दे कॅले इथे खरा मोठा हल्ला होणार आहे असे समजत होते. त्यांनी नॉर्मंडीवरील लढाईदरम्यान २ चिलखती डिव्हिजन्स, तब्बल १९ पायदळाच्या डिविजन्स भलतीकडेच, पास दे कॅले मध्ये अडकवून ठेवल्या.
हुआन पुहोल गार्सिया
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.