स्वयंपाक ही अग्नीच्या किंवा उष्णतेच्या साहाय्याने खाण्यासाठी अन्नपदार्थ व खाद्यपदार्थ तयार करण्याची एक कला, तंत्रज्ञान व कारागिरी आहे. जगभरात स्वयंपाकाचे घटक व पद्धतींमध्ये अनेकानेक बदल आढळतात. खुल्या अग्नीचा वापर करून जाळीवर भाजणे, वेगवेगळ्या भट्ट्यांचा वापर, वाफेचा वापर, विद्युतचलित उष्णता निर्माणकांचा तसेच सौर ऊर्जेचा वापर इत्यादी प्रकार यांत वेगवेगळे पर्यावरणीय, आर्थिक, सांस्कृतिक परंपरा व पद्धतींनुसार दिसून येतात. स्वयंपाक हा तो करणाऱ्याच्या कौशल्यावर अवलंबून असतो; तसेच त्याला मिळालेल्या शिक्षणानुसार, व्यक्तीनुसार व प्रांतानुसार त्यात बदल घडतात.
अग्नी किंवा उष्णतेचा वापर करून अन्न हे एकतर घरी शिजवले जाते अथवा, हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये. स्वयंपाक करणे ही क्रिया मानवात अनन्यसाधारण आहे. असे अनुमान आहे की ही क्रिया सुमारे दोन दशलक्ष वर्षांपूर्वी सुरू झाली असावी, पण पुरातत्त्वीय शोधांनुसार तो काळ सुमारे एक दशलक्ष वर्षे इतका येतो.
शेतीचा व्यापक प्रसार, वाणिज्य व व्यापार तसेच विभिन्न प्रांतांत असलेल्या संस्कृतींमधील दळणवळण याद्वारे स्वयंपाक करणाऱ्यांना अनेकविध घटक पदार्थ मिळत गेले. नवीन शोध तसेच तंत्रज्ञानाचा विस्तार, उकळण्याच्या क्रियेसाठी विविध प्रकारची भांडी, स्वयंपाकाची नवनवीन साधने इत्यादी गोष्टींनी यात भर पडत गेली. त्यामुळे खाद्यपदार्थ तयार करण्याचा कालावधी कमी होत गेला. आधुनिक काळात प्रगत वैज्ञानिक तंत्रज्ञानाद्वारे स्वयंपाकाची लज्जत व गुणवत्ता अधिक वाढवली जाते.
स्वयंपाक
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.