स्टोनवॉल दंगली

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

स्टोनवॉल दंगली (किंवा स्टोनवॉल बंड, स्टोनवॉल क्रांती, किंवा फक्त स्टोनवॉल म्हणूनही ओळखले जाते) ही २८ जून १९६९ रोजी पहाटे न्यू यॉर्क शहरातील लोअर मॅनहॅटनच्या ग्रेनीच व्हिलेज परिसरातील स्टोनवॉल इन येथे झालेल्या पोलिसांच्या छाप्याविरुद्ध उत्स्फूर्त दंगली आणि निदर्शनांची मालिका होती. हे अमेरिकेतील एलजीबीटीक्यू (विविध लिंग आणि लैंगिकतेचे व्यक्ती) लोकांनी लैंगिक अल्पसंख्याकांवर सरकार पुरस्कृत छळाविरुद्ध लढ्यासाठी पहिले निदर्शन नसले तरी, स्टोनवॉल दंगलींमुळे अमेरिकेतील आणि जगभरातील समलैंगिक हक्क चळवळीसाठी एक नवीन सुरुवात झाली.

१९५० आणि १९६० च्या दशकात अमेरिकन समलैंगिक स्त्रियांना आणि पुरुषांना अशा कायदा व्यवस्थेचा सामना करावा लागला जी इतर काही पश्चिम आणि पूर्व ब्लॉक देशांपेक्षा अधिक समलैगिकता-विरोधी होती. अमेरिकेतील सुरुवातीच्या समलैंगिक गटांनी हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की समलैंगिक लोकांना समाजात सामावून घेतले जाऊ शकते आणि त्यांनी समलैंगिक व्यक्ती आणि विषमलैंगिक व्यक्ती दोघांसाठीही संघर्षरहित शिक्षणाला प्राधान्य दिले. पण, १९६० च्या दशकातील शेवटची वर्षे खूप वादग्रस्त होती, कारण नागरी हक्क चळवळ, १९६० च्या दशकातील प्रतिसंस्कृती आणि युद्धविरोधी निदर्शने सारख्या चळवळी सक्रिय होत्या. ग्रेनीच व्हिलेजच्या प्रागतिक वातावरणासह या चळवळींचे प्रभाव स्टोनवॉल दंगलींसाठी उत्प्रेरक ठरले.

१९५० आणि १९६० च्या दशकात फार कमी संस्थांमध्ये समलैंगिक लोकांचे जाहीरपणे स्वागत होत असत. बार मालक आणि व्यवस्थापक क्वचितच समलैंगिक असूनही, या व्यक्तीचे स्वागत करणारे ठिकाण बहुतेकदा बारच होते. स्टोनवॉल इन हे माफियाच्या मालकीचे होते आणि ड्रॅग क्वीन, पारलिंगी समुदायाचे प्रतिनिधी, बायकी स्वभावाचे तरुण पुरुष, पुरुष वेश्या आणि बेघर तरुण या सारखे समलैंगिक समुदायातील सर्वात गरीब आणि दुर्लक्षित लोकांमध्ये लोकप्रिय असलेल्या विविध प्रकारच्या संरक्षकांना सेवा पुरवत असे.

१९६० च्या दशकात समलैंगिक बारवर पोलिसांचे छापे हे नेहमीचेच होते, परंतु, त्यावेळच्या छाप्यांपेक्षा वेगळे, यावेळी माफियाना त्यांच्या आगमनापूर्वी पोलिसांनी सूचना दिल्या नव्हत्या, तसेच न्यू यॉर्क पोलीस विभागाच्या सहाव्या प्रसीमेलाही सूचना देण्यात आल्या नव्हत्या. याशिवाय, आठवड्याच्या रात्री संध्याकाळी छापे टाकले जात असत, जेव्हा बारमध्ये गर्दी कमी असण्याची अपेक्षा होती. याउलट, स्टोनवॉलवरील छापा शुक्रवारी रात्री उशिरा होणार होता, जेव्हा गर्दीचा सर्वात जास्त असण्याची अपेक्षा होती. स्टोनवॉल इनमधील परिस्थितीवरील अधिकाऱ्यांचे नियंत्रण लवकरच सुटले आणि त्यामुळे दंगलीसाठी भडकलेल्या जमावाला गर्दी जमली. न्यू यॉर्क शहर पोलिस आणि ग्रेनीच व्हिलेजमधील समलैंगिक रहिवाशांमधील निर्माण झालेल्या तणावामुळे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आणि त्यापुढे अनेकदा रात्री निदर्शने झालीत. काही आठवड्यांतच, ग्रेनीच व्हिलेजमधील रहिवाशांनी त्वरीत कार्यकर्ते गटांमध्ये संघटित होऊन समलैंगिक व्यक्तींना अटक होण्याची भीती न बाळगता त्यांच्या लैंगिक कलाबद्दल उघडपणे बोलण्यासाठी जागा स्थापन करण्यावर लक्ष केंद्रित केले.

स्टोनवॉल दंगलीनंतर, न्यू यॉर्क शहरातील लैंगिक अल्पसंख्याकांना एकसंध समुदाय बनण्यासाठी लिंग, वर्ग आणि पिढ्यानपिढ्या मांडण्यात आलेल्या अडथळ्यांचा सामना करावा लागला. पुढील आठवडे आणि महिन्यांत, त्यांनी राजकीयदृष्ट्या सक्रिय सामाजिक संघटना सुरू केल्या आणि समलैंगिक आणि पारलिंगी लोकांच्या हक्कांबद्दल उघडपणे बोलणारी प्रकाशने सुरू केली. दंगलीच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त अनेक अमेरिकन शहरांमध्ये शांततापूर्ण निदर्शने करण्यात आली, जी आता स्वाभिमान यात्रांमध्ये बदलले आहेत. २०१६ मध्ये या ठिकाणी स्टोनवॉल राष्ट्रीय स्मारकाची स्थापना करण्यात आली. आज, स्टोनवॉल दंगलीच्या स्मरणार्थ जूनच्या अखेरीस जगभरात दरवर्षी स्वाभिमान कार्यक्रम आयोजित केले जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →