सैद्धांतिक भाषाशास्त्र

थोडक्यात पण महत्त्वाचे.

सैद्धांतिक भाषाशास्त्र किंवा सामान्य भाषाशास्त्र ही भाषाशास्त्राची एक शाखा आहे. हे शास्त्र खुद्द भाषेच्या स्वरूपाचा शोध घेते. भाषा म्हणजे काय; ती कशी कार्य करते; क्षेत्र-विशिष्ट मानसिक अवयव म्हणून सार्वत्रिक व्याकरण (युनिव्हर्सल ग्रामर) अस्तित्त्वात आहे का; असेल तर ते कसे कार्य करते; भाषेची अद्वितीय वैशिष्ट्ये कोणती आहेत; भाषेचा इतर संज्ञानात्मक प्रक्रियेंशी कसा संबंध आहे; यांसारख्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या शास्त्रशाखेत केला जातो. सैद्धांतिक भाषाशास्त्रज्ञ प्रामुख्याने भाषिक ज्ञानाच्या प्रतिकृती (मॉडेल्स) तयार करण्यात आणि शेवटी भाषाशास्त्रीय सिद्धांत विकसित करतात.

१९६० च्या दशकापासून सैद्धांतिक भाषाशास्त्र ही संज्ञा सहसा सामान्य भाषाशास्त्र याच अर्थाने वापरली जात आहे; जरी ती उपयोजित भाषाशास्त्राच्या विरुद्ध संकल्पना मानली जात असली आणि भाषा वर्णन हे मूळतः सैद्धांतिकच असते असे अनेकदा म्हटले जात असले तरीही. त्यामुळे नेहमीची पारिभाषिक संज्ञा पूर्णपणे स्पष्ट आणि सुसंगत नाही.

२० व्या शतकाच्या पहिल्या अर्धात सामान्य भाषाशास्त्र ही संज्ञा अधिक प्रचलित होती (उदाहरणार्थ फर्डिनँड डी सोस्यूरचे प्रसिद्ध पुस्तक कोर्स इन जनरल लिंग्विस्टिक्स), ज्याची तुलना भाषा-विशिष्ट भाषाशास्त्र (ज्याला बहुधा वर्णनात्मक भाषाशास्त्र म्हटले जाते) याच्याशी केली जाऊ शकत होती.

ध्वनिविज्ञान (फोनॉलॉजी), रूपविज्ञान (मॉर्फॉलॉजी), वाक्यविज्ञान (सिंटॅक्स) आणि अर्थविज्ञान (सिमँटिक्स) हे क्षेत्र सामान्यतः सैद्धांतिक भाषाशास्त्राचा गाभा मानले जातात. जरी ध्वनिशास्त्र (फोनेटिक्स) हे बहुधा ध्वनिविज्ञानाला मार्गदर्शन करत असले, तरी त्याला बऱ्याचदा सैद्धांतिक भाषाशास्त्राच्या कक्षेतून वगळले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →