भाषा

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

भाषेविषयीचे कुतूहल प्राचीन काळापासून माणसाला वाटत आले आहे. अगदी पूर्वीपासूनच लोकपरंपरेत भाषेच्या उगमाबद्दल, शक्तीबद्दल विविध आख्यायिका, कहाण्या प्रचलित होत्या, तो त्या कुतूहलाच्याच पूर्तीचा प्रयत्न होय. भाषा हे आपल्या अंतरंगातील मनोगत, भावना, विचार इत्यादी प्रगट करण्याचे साधन आहे, ही जाणीव तर पूर्वीपासून होतीच. पण या साधनाचे स्वरूप नेमके कसे आहे, हे स्पष्ट करण्याचे प्रयत्न आधुनिक कालखंडात विशेषत्वाने होऊ लागले. त्यातूनच भाषाविज्ञान ही ज्ञानशाखाही विकसित होत गेली. बदलत्या काळानुसार भाषेत बदल होत गेल्याचे आपणास दिसून येते. वेगवेगळ्या जाती धर्माची भाषा वेगवेगळी असू शकते.

मराठीतील भाषा हा शब्द मूळ संस्कृत भाषेतील भाष् (म्हणजे बोलणे) या धातूवरून तयार झालेला तत्सम शब्द आहे. भाष्य, भाषक, भाषण, संभाषण, भाषीय हे या धातूपासून निर्माण होणारे भाषेशी निगडित विविध संकल्पना सूचित करणारे शब्द आहेत. या मूळ संदर्भामुळे 'भाषा' ही संज्ञा 'बोलणे' या अर्थाने सर्वसाधारण व्यवहारात वापरली जाणे स्वाभाविक होय. कोणताना कोणता आशय दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भाषा उपयोगात येत असते. हे तिचे आशयवाही माध्यम हे स्वरूप लक्षात घेऊन काही वेळा पशुपक्ष्यांची भाषा, नजरेची भाषा, प्रेमाची भाषा असे शब्दप्रयोगही केले जातात. काही वेळा विशिष्ट अर्थ व्यक्त करण्यासाठी भाषा विशिष्ट शब्द म्हणजे विशिष्ट खुणा अथवा संकेत वापरत असते, या वैशिष्ट्यावर भर देत करपल्लवी, नेत्रपल्लवी या भाषा आहेत, असे म्हटले आहे. संगणकाची भाषा असाही शब्दप्रयोग होतो.

थोडक्यात भाषा हे अभिव्यक्तीचे साधन आहे.

मराठी ही महाराष्ट्रातील महत्त्वाची भाषा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →