सुरक्षा झडप व प्रयुक्ति

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

दाबयुक्त वायू, वाफ किंवा द्रव साठविण्याच्या बंद पात्रातील, पंपातील अथवा पुरवठा नळ्यांतील दाबाने, त्यांच्या रचनेला योग्य ठरविलेल्या पूर्वनिर्धारित (निश्चित केलेल्या) दाबाची मर्यादा उल्लंघिल्यास अशा रचनेत स्फोट, धक्के, जलाघात, ऊर्मी घणाघात किंवा कंपने निर्माण होऊन त्यांची मोडतोड अथवा नुकसानी होईल. हा धोका टाळण्यासाठी अशा रचनेत निर्गम मार्ग ठेवून त्यातील आसनावर व्यवस्थित उघडझाप करणारा भाग [→ झडप] बसविलेला असतो, त्यास ‘सुरक्षा झडप’ असे म्हणतात. ही व्यवस्था अतिरिक्त दाबाला मोकळी वाट करून देऊन अशा रचनेतील दाब कमी करते. ज्या दाबाने सुरक्षा झडप उघडण्याची सिद्घता केलेली असते, त्यास विमोचनी दाब म्हणतात. म्हणून अशा झडपेला ‘विमोचन झडप’ असेही म्हणतात (आ. १). या प्रकारच्या झडपेच्या रचनेत तबकडी झडपेला स्प्रिंगेचे पाठबळ देऊन तरफ दांडीने विमोचनी दाबाची सिद्घता केलेली असते. अतिरिक्त दाब तबकडी झडपेला रेटा देतो व ती उघडून तो बाहेर पडतो. २– ४ टक्क्यांनी पूर्वनिर्धारित दाबात पतन झाले की, झडप पुन्हा आपोआप मिटते. वातसंपीडकात अशी सुरक्षा झडप शासनाच्या नियमाप्रमाणे बसविणे सक्तीचे केलेले असते. अशाच प्रकारे दाबातील विभेदी (फरक) अवस्थेने पंपातील ‘विभेदी सूचि झडप’ आपोआप कार्यान्वित होते (आ. २). अशी झडप पंपाच्या रचनेत सुरक्षिततेसाठी बसविलेली असते. उच्च दाबाच्या पंपात द्रवाच्या प्रवाहातील चढ-उताराने रचनेत बिघाड होण्याची शक्यता असते. अशा वेळी वाढलेल्या दाबाचे विसर्जन आपोआप होण्यासाठी विमोचन झडपेची गरज असते. काही वेळा अकस्मात दाबरेटा मागील बाजूस बसतो. त्यासाठी पृष्ठदाब विमोचन झडप असल्यास दाब कमी होतो.

शहराला पाणीपुरवठा करण्याचे नळ उंचभागी बसविलेल्या जलसाठ्याला जोडलेले असतात. अशा बंद नळात द्रवाच्या वहनवेगात अचानक बदल घडल्यास त्याच्या दाबात वाढ होते आणि नळ किंवा नळाचे सांधे फुटतात. कारण द्रवात ऊर्मी वा लाटा (उधाण) निर्माण होऊन आघाताचे आवाज निघतात, यास जलाघात किंवा जलघण म्हणतात. अशी क्रिया पुरवठा नळांत जागोजागी बसविलेल्या प्रवाहनियमन झडपा एकदम बंद केल्यानेही घडते. त्यासाठी आ. १ मध्ये दाखविलेली ‘नमुनेदार सुरक्षा झडप’ बसवितात. मात्र अशी झडप शंक्वाकृती तबकडीच्या आकाराची असून तिच्या दांड्यावरील स्प्रिंगेवर एका हस्तचाकाने स्क्रू फिरवून पूर्वनिर्धारित दाबाला तिची सिद्घता केलेली असते. या प्रकारच्या झडपेला ‘फूल सुरक्षा झडप’ म्हणतात. पेट्रोल व तेल या द्रवांचे वहन करणाऱ्या पुरवठा नळ्यांत ज्या वेळेस असे आघात निर्माण होतात त्यांना ऊर्मी असे म्हणतात आणि अशा नळ्यांत स्फोट घडून येण्याची शक्यता असते.

पाणीपुरवठा नळ उंच सखल भूभागी बसविलेले असल्याने त्यांतील हवा उंच जागी साठते आणि ती बाहेर निघून जाण्यासाठी त्या त्या ठिकाणी विमोचन झडपा बसवाव्या लागतात. कारण अशी कोंडलेली हवा पाण्याच्या प्रवाहाला अडथळा आणते. त्याचप्रमाणे ज्या वेळेस नळात पाणी नसते त्या वेळेस त्यात बाहेरून शिरलेली हवा कोंडली जाते. नळात पाणी भरत असताना ती बाहेर काढून टाकावी लागते. त्यासाठीही काही अंतरावर विमोचन झडपा बसवाव्या लागतात. या प्रकारच्या झडपांना ‘हवाई झडपा’ म्हणतात. आ. ३ मध्ये पहिल्यासाठी अ प्रकारची व दुसऱ्यासाठी आ प्रकारची झडप दाखविली आहे. अ प्रकारच्या झडपेत नळात पाणी भरल्यावर गोलतरणी वर सरकून झडप बंद होते व पाणी नसल्यावर तरफदांडी खाली सरकून झडप उघडते. आ प्रकारच्या झडपेत हीच क्रिया, परंतु दंडगोल तरणीने घडते. या झडपांचे भाग काशाचे (ब्राँझचे) करतात, तर तरणी तांब्याची बनवितात.

द्रविक चालन यंत्रातील रचनेत दंतचक्री पंपाने तेलावर दाब निर्माण केला जातो. नळ्यावाटे तेल सिलिंडरमध्ये दाबाने भरले जाते. अशा रचनेच्या सुरक्षिततेसाठी जर तेलाचा दाब मर्यादेबाहेर वाढला, तर तो कमी करण्यासाठी स्प्रिंगेचे पाठबळ असलेली विमोचन झडप बसविलेली असते. ही झडप पूर्वनिर्धारित दाबात सिद्घ ठेवलेली असून रचनेत अतिरिक्त दाब निर्माण झाला की, ती आपोआप उघडून जादा दाब विसर्जित होऊन रचनेतील दाबाचे पतन घडून येते. आ. ४ मध्ये विमोचन झडप रचनेत बसविल्याची जागा दाखविली आहे. द्रव व वायू दाबपात्रात अशाच प्रकारच्या विमोचन झडपा बसविलेल्या असतात. उदा., अन्न शिजविण्याच्या घरगुती दाबपात्रात (कुकरमध्ये) अशी झडप बसविलेली असते. [→ गृहोपयोगी उपकरणे].

काही रचनांत स्प्रिंगभारी तर काहींत वजनभारी सुरक्षा झडपा बसविलेल्या असतात. भांड्यातील वाफेचा दाब मर्यादेबाहेर गेला की, भांडे फुटू नये म्हणून विमोचन झडपेतून अतिरिक्त वाफ बाहेर पडते व भांडे सुरक्षित राहते. पाण्यापासून वाफ तयार होणाऱ्या दाबपात्रात वाफेच्या वाढत्या दाबाव्यतिरिक्त दुसरा एक धोका निर्माण होतो. तो म्हणजे जसजसे भांड्यातील पाणी कमीकमी होते तसतसे ते अधिकाधिक तापत जाऊन भांडे फुटण्याचा संभव असतो. त्यासाठी कुकरमध्ये विमोचन झडपेशिवाय दुसरी सुरक्षा झडप बसविलेली असते. वास्तविक तिला ‘सुरक्षा बूच’ म्हणणे जास्त योग्य ठरेल. कारण भांड्याच्या झाकणातील निर्गम मार्गातील छिद्रात बिस्मथ, कॅडमियम व शिसे या धातूंपासून तयार केलेले गलनक्षम (वितळणारे) मिश्रधातूचे बूच बसविलेले असते. त्यामुळे पाणी कमी होऊन भांड्याचे तापमान मर्यादेपेक्षा वाढले की, ही मिश्रधातू वितळून भांड्यातील दाबयुक्त वायू बाहेर पडतो. साध्या विमोचन झडपेत एक पितळी अथवा काशाचे बूच झाकणाच्या डोक्यावरील आसनात बसविलेले असून ते अतिरिक्त वाफेने उचलले जाऊन तेथून वाफ बाहेर पडते. बुचाचे वजन अतिरिक्त वाफेच्या प्रमाणाशी निर्धारित केलेले असते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →