सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग ), किंवा शारीरिक अंतरण हे संसर्गजन्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठी केलेले उपाय होत.
यात मोठ्या गटात एकत्र जमणे टाळणे, दोन व्यक्तींमध्ये सहा फूट किंवा एक मीटर इतके विशिष्ट अंतर कायम ठेवणे, इ.चा समावेश होतो. संसर्ग न झालेल्या व्यक्तीने संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शारीरिक संपर्कात येण्याची शक्यता कमी करून रोगाचा प्रसार कमी करता येतो. परिणामी रोगाने होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी होते. या उपाययोजनेच्या बरोबरच श्वसनाचे आरोग्य आणि हात धुणे यासारखे उपायसुद्धा अंमलात आणले जातात. २०१९-२० च्या कोव्हिड रोगाच्या उद्रेकादरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने 'सामाजिक' अंतरणाच्या ऐवजी 'शारीरिक अंतरण' असा शब्द वापरण्यास सुचवले. शारीरिक अंतरणामुळे रोगप्रसार कमी करता येतो, आणि या काळातसुद्धा समाज माध्यमांद्वारे लोक सामाजिकदृष्ट्या जोडलेले राहू शकतात, अशी यामागची भावना आहे.
संसर्गजन्य रोगांचा प्रसार कमी करण्यासाठी आणि आरोग्यसेवांवरचा ताण वाढू नये म्हणून, विशेषतः साथीच्या रोगाच्या वेळी, शाळा आणि कार्यालये बंद करणे, अलगीकरण, विलगीकरण, लोकांची हालचाल प्रतिबंधित करणे आणि लोकांनी एकत्र येण्यास बंदी घालणे (जमावबंदी) यासह सामाजिक अंतरणाचे अनेक उपाय अमलात आणले जातात.
आधुनिक काळात अनेक सार्वत्रिक साथींमध्ये सामाजिक अंतरणाचे उपाय यशस्वीरित्या अंमलात आणले गेले आहेत. सेंट लुईसमध्ये, १९१८ मधील फ्लूच्या साथीच्या काळात शहरात इन्फ्लूएंझाची पहिली घटना आढळल्यानंतर लगेचच अधिकाऱ्यांनी शाळा बंदी, सार्वजनिक मेळाव्यांवरील बंदी आणि अन्य सामाजिक अंतरण उपायांची अंमलबजावणी केली. फिलाडेल्फियाच्या तुलनेत सेंट लुईसमधील मृत्यूंचे प्रमाण फारच कमी होते, पण तिथे इन्फ्लूएंझाची प्रकरणे असूनही, सामूहिक परेड चालू ठेवण्यास परवानगी मिळाली आणि पहिल्या घटनेनंतर दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळपर्यंत सामाजिक अंतरणाची अंमलबजावणी केली गेली नाही. २०१९-२०२० च्या कोरोनव्हायरसच्या जागतिक साथीच्या काळात सध्या जगातील अनेक देशांमध्ये सामाजिक अंतरणाचे उपाय योजण्यात येत आहेत.
जेव्हा संसर्गजन्य रोग खोकला किंवा शिंकणे याद्वारे उडणाऱ्या थेंबांद्वारे किंवा लैंगिक संपर्कासह थेट शारीरिक संपर्क, अप्रत्यक्ष शारीरिक संपर्क (उदा. दूषित पृष्ठभागाला स्पर्श करून); किंवा हवेद्वारे प्रसारित (जर सूक्ष्मजीव हवेत दीर्घ काळासाठी टिकू शकत असेल तर) होत असेल तर सामाजिक अंतरण ठेवण्याचे उपाय अधिक प्रभावी ठरतात; जेव्हा संसर्ग प्रामुख्याने दूषित पाणी किंवा अन्नाद्वारे किंवा डास किंवा इतर कीटकांसारख्या प्रसारकाद्वारे संक्रमित होत असतो तेव्हा असे उपाय कमी प्रभावी असतात.
सामाजिक अंतरणाचे तोटे म्हणजे एकटेपणा, उत्पादकता कमी होणे आणि मानवी संवादाशी असलेले इतर फायदे न मिळणे.
सामाजिक अंतरण
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.